ST Location : आता एसटीचं परफेक्ट लोकेशन कळणार; दसऱ्याला परिवहन मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आपली एसटी’ या नव्या मोबाइल ॲपचे लोकार्पण केले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा करताना सांगितले की, या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर होईल. १२,००० हून अधिक बसेस आणि राज्यभरातील १ लाखांपेक्षा जास्त मार्गांचे मॅपिंग करून विकसित केलेल्या या ॲपचा लाखो प्रवासी भविष्यात उपयोग करतील. तथापि, सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आल्यास प्रवाशांनी त्याबाबत अभिप्राय द्यावेत, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.
आपली एसटी’ – मराठमोळे नाव
‘आपली एसटी’ या नावाने सादर करण्यात आलेले हे ॲप MSRTC च्या कम्यूटर ॲपचे सुधारित रूप आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ॲपला मराठमोळे नाव देऊन सर्वसामान्य मराठी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत त्यात अनेक उपयुक्त सुविधा समाविष्ट केल्या आहेत. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या या ॲपद्वारे प्रवाशांना जवळच्या बस थांब्याची माहिती, बसचे सुटण्याचे वेळ (STD), आणि थांब्यावर पोहोचण्याचा अंदाजे वेळ (ETA) यासारखी रिअल-टाइम माहिती मिळेल. यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, आणि ते बस उपलब्धतेनुसार थेट थांब्यावर पोहोचू शकतील.
ॲपमधील वैशिष्ट्ये
‘आपली एसटी’ ॲप अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यात खालील प्रमुख सुविधांचा समावेश आहे.
– जवळच्या बस थांब्यांचा शोध घेण्याची सुविधा.
– दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती.
– आरक्षित तिकीटातील बस क्रमांक किंवा सेवा क्रमांक टाकून बसचा लाइव्ह मागोवा (ट्रॅकिंग).
– आपत्कालीन परिस्थितीत एका क्लिकवर उपलब्ध आपत्कालीन क्रमांकांची यादी.
सध्या या ॲपवर राज्यातील १२,००० हून अधिक बसेसचा लाइव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेसचे लोकेशन या ॲपद्वारे शोधता येणार आहे. प्रवाशांच्या अभिप्रायानुसार ॲपमध्ये सतत सुधारणा केल्या जाणार असून, लवकरच MSRTC च्या सध्याच्या तिकीट बुकिंग ॲपमध्येही लाइव्ह डेटा समाविष्ट करण्यात येईल. यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळ कटिबद्ध
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘आपली एसटी’ ॲप हे प्रवाशांना विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी महामंडळाला प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना स्वीकारून ॲपमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. सध्या हे ॲप ‘MSRTC Commuter App’ या नावाने प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, आणि लवकरच ‘आपली एसटी’ हे नाव अधिकृतपणे प्ले स्टोअरवर दिसेल, अशी माहिती परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.





