ST Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! कर्मचाऱ्यांना 10 हजारांचे सानुग्रह अनुदानाची घोषणा; महागाई भत्ताही वाढवला
ST Diwali Bonus : महाराष्ट्रातील 83 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण उचल आणि महागाई भत्ता 60 टक्के करण्याची घोषणा.

ST Diwali Bonus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीची भेट जाहीर केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये सण उचल मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 5 नोव्हेंबर 2026 रोजी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.
महामंडळावर 160 कोटींचा आर्थिक भार
एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असले, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे 160 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटीचे कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सेवा देतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या पाठबळामुळे हा निर्णय घेता आल्याचेही त्यांनी सांगितले.
संप न करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतेही आंदोलन किंवा संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले. एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवासी या दोघांचेही हित जपणे महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्यास सरकार तयार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





