एसटी कर्मचाऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, परभणीतील घटना

परभणी – परभणीतील एसटी चालकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मुजफ्फर खान जाफर खान असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. ते जिंतूर आगारात बस चालक होते. खान यांच्या आत्महत्येनंतर परभणीतील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मयत खान यांचा मृतदेह परभणी आगारात आणण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चार वाजता जिंतूर बस स्थानकावरून निघाल्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राषण केले. त्यानंतर भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे एसटी कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच खान यांचा मृतदेह एसटी आगारात नेण्यासाठी आग्रह धरला. परंतु, पोलिसांनी मृतदेह हलवू दिला नाही. एसटीचे विभागीय नियंत्रक जोशी यांनी खान यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. परंतु, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे अशाप्रकारे चालक-वाहक कर्मचारी आपली जीवनयात्रा संपवत आहेत.





