Pune Gramin : महुडे मार्गावर एसटी बस पलटी, शाळकरी मुलींचा थोडक्यात बचाव; रस्ता रुंदीकरणाची मागणी तीव्र

नसरापूर, (भोर) : भोर तालुक्यातील महुडे मार्गावर मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. भोर आगाराची एसटी बस (क्र. एमएच-०६ एस-८२८९) अरुंद रस्त्यावरून घसरून पलटी झाली. या अपघातात बसमधील सहा शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या असून, एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. बसचालक आणि वाहक सुखरूप असले तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
महुडे येथील शाळेतून सुटल्यानंतर सहा मुली माळवाडीला जाण्यासाठी या बसमधून प्रवास करत होत्या. महुडे खुर्द आणि महुडे बुद्रुक दरम्यानच्या खुडेवस्ती परिसरातील विहिरीजवळील चढावर हा अपघात घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देताना बस रस्त्यालगतच्या गटारात घसरली आणि उलटली. याच ठिकाणी गेल्या वर्षी पावसाळ्यातही असाच अपघात घContracts:डला होता, ज्यामुळे हा रस्ता किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलींना सुखरूप बाहेर काढले. किरकोळ जखमी झालेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोर आगाराचे अधिकारीही त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू केला.
स्थानिकांनी रस्त्याच्या अरुंदपणामुळे आणि धोकादायक वळणांमुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा रस्ता रुंद करणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी याच ठिकाणी अपघात होतात, पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.





