NCMC card : एसटी प्रवासात महिलांना दिलासा; एनसीएमसी कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय
NCMC card : एसटी प्रवासातील सवलतींसाठी महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय पुढे ढकलला. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्डशिवाय सवलतीचा लाभ घेता येणार.

NCMC card : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने पुढे ढकलला आहे. आता १ जानेवारी २०२७ पासून हे कार्ड अनिवार्य होणार आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात कार्ड नसतानाही महिलांना एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेता येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
प्रवास सवलतींचा लाभ देण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण सुरू केले आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी आणि वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांकडून कार्डसाठी अधिक मुदत देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी शिबिरे –
राज्यातील सर्व पात्र महिलांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवली जाईल. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची नोंदणी आणि कार्ड वितरण पूर्ण करण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे.
त्यामुळे महिलांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ३१ डिसेंबरपूर्वी एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.





