ST Bus : एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात होणार नोकरभरती, परिवहन मंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई : एसटी महामंडळात लवकरच मोठी नोकरभरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळातील रिक्त पदांसोबत काही रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.
आगामी काही वर्षांत एसटीच्या ताफ्यात तब्बल 25 हजार स्वमालकीच्या नव्या बसेस दाखल केल्या जाणार असून, या बसेसच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार असल्याने ही भरती करण्यात येणार आहे असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या 307 व्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी तो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामुळे चालक, वाहक आणि विविध इतर वर्गांतील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कशी होणार भरती?
एसटीच्या विविध विभागांमध्ये सध्या कुशल अभियंत्यांची कमतरता जाणवत आहे. विशेषतः भविष्यात पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्वावर विकसित होणाऱ्या जागांवर, बांधकाम विभागात कुशल अभियंत्यांची गरज असणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या अभियंता पदांवर करार पद्धतीने किंवा सरळसेवा भरतीमार्फत नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
प्रताप सरनाईकांनी दिले निर्देश
“एसटीच्या सक्षमीकरणासाठी केवळ बसेस नव्हे तर कुशल व तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाचीही गरज आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याने आपापल्या रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन एकत्रित भरतीची मागणी सादर करण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.





