ST Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या एसटी दरीत कोसळली; वरंध घाटात नेमकं काय घडलं?

अलिबाग : सुनेभाऊ येथून महाडच्या दिशेने येणारी एसटी बस शनिवारी ५० फूट दरीत कोसळली. हा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना भोर महाड मार्गावर वरंध घाटात घडली. वरंध गावच्या जवळ असलेल्या एका तीव्र वळणार असताना हा अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याला घासत सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली.
सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नाही. मात्र बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस, बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी एसटीमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी महाड येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
दरम्यान, पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध घाटाचे राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाच्या वतीने नुकतेच काम करण्यात आले आहे. वरंध घाट ते रायगड जिल्हा हद्द या दरम्यान संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी काही महिने या मार्गावरील वाहतूक बंद करून ठेवण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती.





