ST Fare Hike : एसटीचा प्रवास महागला! महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एसटीचा प्रवास आता महागणार आहे. महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने वाहतूक सेवांच्या भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्याने तसंच महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी 1 जानेवारी 2025 रोजी परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला अखेर मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलाने वाहतूक सेवांच्या भाडेदरात 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू केली जाणार आहे. याआधी 26 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. दरम्यान भाडेदरात वाढ झाल्याने आता नवे दर कसे असतील हे जाणून घेऊया..
नवे दर कसे असणार आहेत –
एसटीमधून प्रवास करता प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडं आकारलं जातं. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल. निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. शिवशाही (एसी) बसंच भाडं 12.35 वरुन 16 रुपये झालं आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसंच शिवनेरीचं (एसी) भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये असणार आहे तर शिवनेरी स्लिपरचं भाडं 28 रुपये असणार आहे.




