SSC Board Exam – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा शुक्रवारपासून (दि. २०) सुरू झाली. भोर आणि राजगड (वेल्हा) तालुक्यातील १० परीक्षा केंद्रांवर मिळून एकूण ३१०८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत धाकधूक आणि ताण असतो. मात्र, पहिला पेपर अपेक्षेपेक्षा सोपा गेल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. राजा रघुनाथराव विद्यालयाचा विद्यार्थी शौर्य सुर्वे म्हणाला की, पालकांचा मानसिक आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य सराव यामुळे पेपर अत्यंत सोपा गेला. तर, आपल्याच विद्यालयात परीक्षा केंद्र असल्याने मनावर कोणताही ताण जाणवला नाही, असे मत यज्ञेश डेरे याने व्यक्त केले. परीक्षेच्या निमित्ताने ‘स्वामी समर्थ सेवा केंद्र’ भोरच्या वतीने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवेकरी संतोष कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल या केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. शाळा स्तरावर योग्य नियोजन केल्यामुळे परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वास केंद्रसंचालक लक्ष्मण भांगे यांनी व्यक्त केला.