श्रीलंकेचे कायदा मंत्री लढवणार अध्यक्षीय निवडणूक; मंत्रिपदाचा दिला राजीनामा

कोलंबो : श्रीलंकेचे कायदा मंत्री विजयदासा राजपक्षे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी गेल्या शुक्रवारी निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. त्यानंतर स्वत:ला उमेदवार घोषित करणारे ६५ वर्षीय राजपक्षे हे मंत्रिमंडळातील दुसरे सदस्य बनले. अध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लवकरच नवीन आघाडी देखील स्थापन केली जाणार असल्याचे राजपक्षे यांनी म्हटले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विक्रमसिंघे आणि आपल्यात मतभेद झाले आहेत. एकाच मंत्रिमंडळातील दोन व्यक्ती ही निवडणूक लढवणार आहेत. विक्रमसिंघे यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय आपण घेतला. आपल्या नेतृत्वाखाली सरकामधील मतभेदाचे मुद्दे सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
राजपक्षे यांना माजी अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांचा पाठिंबा आहे. सिरिसेना यांच्याकडे श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या एका गटाचे नेतृत्व आहे. हा पक्ष आणि सिरिसेना यांच्याकडील नेतृत्वाच्या मुद्यावर कायदेशीर विवाद सुरू आहे. सिरिसेना यांच्या नेतृत्वावर काही सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राजपक्षे यांनी मात्र श्रीलंका फ्रीडम पार्टीचे ९० टक्के सदस्य त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याचा दावा केला आहे.





