Sri Lanka Cricket : आयसीसीकडून श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे निलंबन; समोर आलं ‘हे’ कारण…

लंडन :– आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (एसएलसी) निलंबित केले आहे. बोर्डात सरकारच्या हस्तक्षेपानंतर आयसीसीने त्यांचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने काढून घेतले आहे. (Sri Lanka Cricket suspended by ICC over breach of regulations) भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातही श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. लंकन संघाला स्पर्धेत 9 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड नुकतेच देशाच्या सरकारने पूर्णपणे विसर्जित केले आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबाबत आयसीसीने म्हटले आहे की, श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारचा खूप हस्तक्षेप होता. कोणत्याही आयसीसी सदस्याच्या कामात सरकारी हस्तक्षेप नसावा. मात्र गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका बोर्ड खुलेपणाने काम करू शकत नसल्याने बोर्डावर तात्काळ निलंबन करण्यात येत आहे.
18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, निलंबनानंतर श्रीलंकन क्रिकेटवर सध्या तरी कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण डिसेंबरपर्यंत संघ कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही आणि जानेवारीपर्यंत कोणताही निधी बोर्डाकडे हस्तांतरित केला जाणार नाही.
अंडर-19 विश्वकरंडकाचे यजमानपद धोक्यात
“आयसीसी’च्या निलंबनानंतर, खेळाडूंवर क्वचितच काही परिणाम होणार असला तरी आयसीसी श्रीलंका बोर्डाचा महसूल रोखू शकते. याशिवाय पुढील आयसीसी स्पर्धेचे यजमानपदही त्यांच्याकडून हिरावून घेतले जाऊ शकते. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत 19 वर्षाखालील पुरुष विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. आयसीसीचे बोर्ड सदस्यत्व कायम न ठेवल्यास या स्पर्धेचे यजमानपदही त्यांच्याकडून काढून घेतले जाऊ शकते.





