लक्षवेधी : अर्थव्यवस्थेला स्थिरतेचा नोबेल मार्ग
2026चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड (Robert Hall & Michael Woodford) यांना प्रदान करण्यात आला आहे.

– समीर ठाकूर
Robert Hall & Michael Woodford : 2026चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड (Robert Hall & Michael Woodford) यांना प्रदान करण्यात आला आहे. समष्टी स्थिरीकरणाच्या सूक्ष्म आर्थिक पायाभरणीसाठी त्यांनी केलेल्या अग्रगण्य कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
सरकार आणि मध्यवर्ती बँका वापरत असलेले स्थिरीकरण धोरण हे सुनिश्चित करते की आर्थिक घडामोडींवर अनपेक्षित धक्क्यांचा परिणाम होणार नाही. अभूतपूर्व काळात अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी त्या विविध साधनांचा वापर करतात. या धोरणकर्त्यांचे मुख्य लक्ष्य हे धक्के कमीत कमी करणे हे असते. ते बेरोजगारी आणि आर्थिक वृद्धी यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे अर्थव्यवस्थेला उच्च महागाई आणि बेरोजगारीच्या दरांना सामोरे जावे लागत नाही. कंपन्या आणि कुटुंबे या दोघांनाही अर्थव्यवस्थेच्या अचानकच्या चढ-उतारांपेक्षा स्थिर दृष्टिकोन हवा असतो. आर्थिक चढ-उतारांमधील अचानक, मोठ्या बदलांसाठी ते तयार नसतात.
हॉल आणि वुडफोर्ड (Robert Hall & Michael Woodford) यांच्या कार्यामुळे जगभरातील सरकारे आणि मध्यवर्ती बँकांना अर्थव्यवस्थेत कोणते स्थिरीकरणाचे धोरण राबवायचे याबाबत निर्णय घेण्यास मदत होते. यातून स्थिरीकरण धोरणाच्या शिफारशींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आधीच्या केन्शियन मॉडेलकडून आता हॉल आणि वुडफोर्ड यांनी सुधारित केलेल्या न्यू केन्शियन मॉडेलकडे वाटचाल झाली आहे. पूर्वी नेहमी व्यापक समष्टी अभ्यासातून सूक्ष्म पातळीवर यायचो, पण आता सूक्ष्म पातळीपासून समष्टी पातळीपर्यंत अभ्यास केला जातो.
केन्शियन समष्टी मॉडेलमध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीवर नेहमीच भर दिला जातो. 1929च्या दुसर्या महायुद्धानंतरच्या जागतिक महामंदीच्या काळात, जेव्हा सूक्ष्म आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढू शकली नाहीत, तेव्हा जॉन मेनार्ड केन्स यांनी सरकारने निष्क्रिय भूमिकेतून बाहेर पडून सक्रिय भूमिका बजावावी असा आग्रह धरला. हा विचार अभिजात आणि नव-अभिजात अर्थतज्ज्ञांच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध होता.
केन्स यांनी महागाई, उपभोग, बेरोजगारी आणि उत्पादन यांच्यात सरळसोट संबंध असल्याचे मांडले. या चलांमधील या सरळ संबंधामुळे उपभोग वाढवणे किंवा कमी करणे सोपे होते. त्यामुळे आर्थिक घडामोडी वाढवणे किंवा कमी करणे हे सोपे, साधे सरळ होते. स्थिरीकरण धोरणातील सर्वात किचकट भाग म्हणजे कुटुंबांनी केलेल्या खासगी उपभोगाचा अंदाज कसा लावायचा हा होता.
कारण त्याच्या अचूक मोजमापाची कोणतीही ठोस पद्धत माहीत नव्हती आणि तो प्रत्यक्षात पाहून नोंदवणे हे सर्वात योग्य परंतु महाकठीण काम होते. त्यामुळे जेव्हा अर्थव्यवस्थेला अचानक धक्के बसतात, तेव्हा कुटुंबे भविष्यात उपभोगाबाबत कोणते निर्णय घेतील याचा अंदाज घेणे आणखीच कठीण होऊन बसते.
केन्स यांची समष्टीवादी धोरणे 1970 च्या तेल संकटासारख्या अचानक आलेल्या धक्क्यांवर उपाय देऊ शकली नाहीत. रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांनी 1970 पासूनच्या आकडेवारीचा अभ्यास समष्टी दृष्टिकोनातून न करता सूक्ष्म आर्थिक दृष्टिकोनातून केला. त्यांनी न्यू केन्शियन आर्थिक विचारसरणीचा मूलभूत पाया रचला, जो सूक्ष्म पायावर आधारित आहे.
यामध्ये मोठ्या संख्येने कुटुंबे उपभोग वाढवणे, कमी करणे किंवा स्थिर ठेवणे याबाबत निर्णय घेतात, जी अर्थव्यवस्थेची मागणीची बाजू आहे. दुसरीकडे पुरवठ्याच्या बाजूला कंपन्या त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या किमती ठरवण्यासाठी भविष्यातील व्याजदरातील अपेक्षित बदलांकडे पाहून निर्णय घेतात.
अशाप्रकारे अर्थव्यस्थेची मागणी आणि पुरवठ्याची बाजू समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असते. जेणेकरून किमती स्थिर राहतील. त्यांनी कुटुंबे आणि कंपन्या या दोघांनीही सूक्ष्म पातळीवर घेतलेल्या लाखो निर्णयांवर आधारित एक मॉडेल विकसित केले आहे, जे अर्थव्यवस्थेची मागणीची आणि पुरवठ्याची बाजू दाखवते.
हॉल यांनी कुटुंबांच्या निर्णयांच्या मागणीच्या बाजूचा अभ्यास केला आहे, जो पुढे अर्थव्यवस्थेच्या भविष्याबद्दल आशावादी किंवा निराशावादी दृष्टिकोनावर अवलंबून असतो, जसे की भविष्यातील उपभोग आणि उत्पन्नाची पातळी. ते भविष्यातील अपेक्षांचा अंदाज घेऊन आजच्या उपभोगाच्या सवयी बदलतात, ज्या भविष्यातील माहितीवर आधारित असतात.
आता, भविष्यातील माहिती किंवा उपभोगाचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे उपभोगाचा अंदाज लावणे शक्य नाही. त्यांनी हे शक्य का नाही हे तपासण्यासाठी सूक्ष्म माहितीचा वापर केला, ज्यामध्ये त्यांना असे आढळले की 80% कुटुंबांनी या सिद्धांताचे पालन केले आणि 20% कुटुंबे जी हातातोंडाशी जगतात त्यांनी या सिद्धांताचे पालन केले नाही.
वुडफोर्ड (Robert Hall & Michael Woodford) यांच्या मॉडेलमध्ये अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी वापरले जाणारे धोरणात्मक साधन असलेल्या व्याजदरांमध्ये वाढ किंवा घट केल्यास त्याचा सकल देशांतर्गत उत्पन्न आणि महागाईवर काय परिणाम होतो यावर चर्चा केली आहे. अशा परिस्थितीत केन्शियन मॉडेल फारसे विश्वासार्ह नव्हते. वुडफोर्ड ह्यांनी वापरलेल्या सूक्ष्म पायावर आधारित मॉडेलमध्ये कंपन्या उत्पादन, उपभोग आणि उत्पादनांच्या किमतींबाबत घेत असलेल्या निर्णयांबद्दल सांगितले आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की उपभोग हा कुटुंबांच्या भविष्यातील उत्पन्नाच्या अपेक्षांवर अवलंबून असतो.
त्यांच्या मते, कंपन्यांच्या व्याजदराच्या अपेक्षा हा उपभोग ठरवणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. महागाईवर उत्पादन तफावतीचा प्रभाव पडतो. ही तफावत पुढे अर्थव्यवस्थेतील मागणीच्या दबावामुळे प्रभावित होते. ही उत्पादन तफावत म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन आणि नैसर्गिक उत्पादन यातील फरक आहे.
नैसर्गिक उत्पादनावर ऊर्जा संकट किंवा इतर अनपेक्षित घटनांसारख्या पुरवठा धक्क्यांचा परिणाम होतो.
त्यामुळे महागाई वाढते, उत्पादन कमी होते आणि बेरोजगारी वाढते. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा उपाय त्यांनी सुचवला आहे. अशा प्रकारे, त्यांच्या मॉडेलने जगभरातील सरकारांना 1970च्या तेल संकटाच्या काळापेक्षा अलीकडच्या पुरवठा धक्क्यांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास आणि प्रतिसाद देण्यास मदत केली आहे.
आज जगाला भू-राजकीय तणाव, ऊर्जा संकट, पुरवठा साखळीतील अडथळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारे बदल अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी हॉल आणि वुडफोर्ड (Robert Hall & Michael Woodford) यांचे संशोधन अधिकच महत्त्वाचे ठरते. सूक्ष्म आर्थिक वर्तन आणि व्यापक आर्थिक धोरण यांच्यातील संबंध उलगडून दाखवणार्या त्यांच्या कार्यामुळे आधुनिक अर्थशास्त्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यामुळेच 2026 च्या अर्थशास्त्रातील नोबेल सन्मानाचे ते मानकरी ठरले आहेत.






