लक्षवेधी : डिजिटल युगातील नवी सत्ता
अल्गोरिदम (Algorithm) कोणत्या विषयाला महत्त्व मिळेल, कोणता विषय दुर्लक्षित राहील हे ठरवत आहेत. त्यामुळे माहिती क्षेत्र हे आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे सामरिक रणांगण बनले आहे.

– हेमंत महाजन
Algorithm : अल्गोरिदम (Algorithm) कोणत्या विषयाला महत्त्व मिळेल, कोणता विषय दुर्लक्षित राहील हे ठरवत आहेत. त्यामुळे माहिती क्षेत्र हे आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे सामरिक रणांगण बनले आहे.
इतिहासात सत्तापालटासाठी युद्धे झाली, क्रांती घडल्या, राजवटी उलथवून टाकल्या गेल्या. परंतु एकविसाव्या शतकात सत्तेचे स्वरूप बदलले आहे. आज सत्ता केवळ भूभाग, सैन्य किंवा अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवून मिळत नाही; ती माहितीवर, लोकांच्या भावनांवर आणि त्यांच्या विचारप्रक्रियेवर नियंत्रण ठेवूनही मिळू शकते. या नव्या वास्तवात सोशल मीडिया अल्गोरिदम हे अत्यंत प्रभावशाली साधन म्हणून उदयास आले आहेत.
अल्गोरिदम (Algorithm) म्हणजे केवळ तांत्रिक प्रणाली नसून ते आजच्या काळातील माहितीचे द्वारपाल आहेत. कोणती बातमी लोकांपर्यंत पोहोचेल, कोणता व्हिडिओ व्हायरल होईल, कोणत्या विषयावर चर्चा रंगेल आणि कोणता मुद्दा दुर्लक्षित राहील हे मोठ्या प्रमाणावर हेच अल्गोरिदम ठरवतात. त्यामुळे डिजिटल माध्यमे आता फक्त संवादाची साधने राहिलेली नाहीत; ती जनमत घडविणारी, सामाजिक प्रवाहांना दिशा देणारी आणि राजकीय घडामोडींवर परिणाम करणारी शक्तिशाली यंत्रणा बनली आहेत.
सर्वात मोठी डिजिटल पिढी
भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची युवा लोकसंख्या. 2026 मध्ये 14 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या सुमारे 40 कोटींहून अधिक आहे. ही भारतीय इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जिने इंटरनेटशिवाय जग अनुभवलेले नाही. त्यांच्या बालपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हे जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. परिणामी त्यांचे विचार, सामाजिक संबंध, माहितीचे स्रोत आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी या सर्वांवर डिजिटल माध्यमांचा मोठा प्रभाव आहे.
अल्गोरिदमची कार्यपद्धती
सोशल मीडिया कंपन्यांचा व्यवसाय माहिती विकण्याचा नसून वापरकर्त्यांचे लक्ष विकण्याचा आहे. त्यांच्या महसुलाचा मुख्य स्रोत जाहिराती असल्याने वापरकर्ते जास्तीत जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर राहणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते.
यासाठी अल्गोरिदम (Algorithm) अशा सामग्रीला प्राधान्य देतात जी लोकांना भावनिकदृष्ट्या अधिक गुंतवून ठेवते. राग, भीती, संताप, धक्का किंवा संघर्ष निर्माण करणार्या पोस्ट लोक जास्त वेळ पाहतात, त्यावर प्रतिक्रिया देतात आणि इतरांना शेअर करतात. परिणामी अशा प्रकारच्या सामग्रीला अधिक दृश्यमानता मिळते.
याउलट शांत, संतुलित आणि सखोल विश्लेषण करणारी सामग्री तुलनेने कमी लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे सार्वजनिक चर्चेचे स्वरूप हळूहळू बदलते व वास्तवापेक्षा भावनांचे महत्त्व वाढते.
सोशल मीडिया आधुनिक शस्त्र
आधुनिक प्रचारयंत्रणा खोट्या गोष्टी निर्माण करण्यावर अवलंबून नसते. ती एखाद्या घटनेची विशिष्ट बाजू अधोरेखित करते, काही तथ्यांना अधिक प्रसिद्धी देते आणि इतर तथ्ये मागे ढकलते. अशा प्रकारे लोकांच्या मनात विशिष्ट कथानक निर्माण केले जाते. कालांतराने हे कथानकच वास्तव म्हणून स्वीकारले जाऊ लागते.
डिजिटल प्रभावाचे धडे
गेल्या दशकात जगभरात अनेक घटनांमध्ये सोशल मीडिया आणि अल्गोरिदमच्या प्रभावाची झलक दिसून आली आहे. अमेरिकेतील हंटर बायडेन लॅपटॉप प्रकरण, म्यानमारमध्ये फेसबुकच्या शिफारस प्रणालीने रोहिंग्या समाजाविरुद्धच्या द्वेषपूर्ण प्रचाराला चालना दिल्याचे आरोप झाले. अरब स्प्रिंगच्या काळात सोशल मीडिया हे लोकसंघटन आणि आंदोलनाचे प्रमुख साधन बनले.
त्यानंतर अनेक देशांतील सरकारांनी माहिती क्षेत्राला राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा घटक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांमध्ये सोशल मीडिया हे संघटन आणि जनमत निर्मितीचे प्रमुख माध्यम बनले. अनेकदा लोकांच्या मनात आधीपासून असलेल्या असंतोषाला डिजिटल माध्यमे वेग देतात.
एखादी समस्या, अन्याय किंवा प्रशासनातील त्रुटी यांना भावनिक स्वरूप देऊन व्यापक जनआंदोलनात रूपांतरित केले जाऊ शकते. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो- सोशल मीडिया असंतोष निर्माण करत नाही; परंतु विद्यमान असंतोषाला अभूतपूर्व वेग आणि व्यापकता प्रदान करू शकतो.
भारतातील आव्हाने
भारतासारख्या विशाल लोकशाहीमध्ये परीक्षा प्रणालीतील त्रुटी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणे, सामाजिक तणाव आणि आर्थिक विषमता यांसारखे अनेक संवेदनशील विषय आहेत. या विषयांबाबतची नाराजी जर डिजिटल माध्यमांद्वारे सतत वाढविली गेली, तर ती राष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे माहिती युद्ध आणि मानसशास्त्रीय युद्ध ही राष्ट्रीय सुरक्षेची नवी आव्हाने बनली आहेत.
भारतासाठी आवश्यक धोरण
डेटा स्थानिकीकरण, पारदर्शकता, अल्गोरिदमविषयी उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन यावर भर देणे आवश्यक आहे. भारतात निर्माण होणारा डेटा भारतातच साठविणे, मोठ्या प्लॅटफॉर्मचे नियमित लेखापरीक्षण करणे आणि दिशाभूल करणार्या माहितीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हे काही महत्त्वाचे उपाय ठरू शकतात. चीन, रशिया आणि तुर्कीएसारख्या देशांनी विविध स्वरूपात अशा उपाययोजना केल्या आहेत. भारताने लोकशाही मूल्यांचे संरक्षण करत स्वतःचा स्वतंत्र मार्ग विकसित करणे आवश्यक आहे.
दोन स्तरांवरील राष्ट्रीय प्रतिसाद
या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन आघाड्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल. पहिली आघाडी म्हणजे समाजातील वास्तविक समस्यांचे निराकरण. जेथे प्रशासनिक त्रुटी, भ्रष्टाचार किंवा अन्याय आहे तेथे त्वरित सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण कोणतेही डिजिटल कथानक तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा त्याला वास्तवाचा आधार मिळतो.
दुसरी आघाडी म्हणजे माहिती क्षेत्रातील स्पर्धा. खोट्या, दिशाभूल करणार्या किंवा एकांगी कथानकांना उत्तर देण्यासाठी सरकार, शैक्षणिक संस्था, माध्यमे आणि नागरी समाज यांनी तथ्याधारित माहितीचे प्रभावी प्रसारण करणे आवश्यक आहे.
माहितीचे स्वातंत्र्य की अल्गोरिदमिक (Algorithm) नियंत्रण?
चीनच्या धर्तीवर आपणही फेसबूक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सऐवजी स्वतःची भारतीय सोशल मीडिया माध्यमे विकसित करू शकतो. मात्र, या प्रक्रियेला बराच वेळ लागेल, तोपर्यंत आपल्याला काही काळासाठी या पाश्चात्य माध्यमांवरच अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे, जोपर्यंत स्वदेशी पर्याय तयार होत नाहीत, तोपर्यंत या विदेशी कंपन्यांना आपल्या देशाच्या आणि राष्ट्रीय हिताच्या चौकटीत राहूनच काम करण्यास भाग पाडणे अत्यंत गरजेचे आहे.
भारताने तांत्रिक प्रगती, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय हित यांच्यात योग्य समतोल साधणारे धोरण विकसित करणे आवश्यक आहे. कारण भविष्यातील संघर्ष केवळ सीमांवरच नव्हे, तर नागरिकांच्या मनांमध्ये आणि मोबाइलच्या स्क्रीनवरही लढले जाणार आहेत.






