तिरुवनंतपूरम – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जुगाराच्या ऍपची जाहिरात करणे चांगलेच भोवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑनलाइन गेमिंगची जाहिरात केल्याप्रकरणी कोहलीला केरळ उच्च न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस बजावली आहे.
कोहली सदिच्छादूत असलेल्या एका ऑनलाइन रमी गेममुळे त्याला ही नोटीस आली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, कोहलीचा चाहतावर्ग मोठा असून तो अशा जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाइन गेमिंगसारख्या चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कर्णधार विराट कोहली हा एका ऑनलाइन रमी गेमची जाहिरात करतो. त्याच्यासोबत प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता अज्जू वर्गीस हेदेखील ही जाहिरात करतात. त्यामुळे या याचिकेच्या आधारावर केरळ उच्च न्यायालयाने या तिघांनाही नोटीस बजावली आहे.
तिरुअनंतपुरमच्या विनीथ नावाच्या तरुणाचे हा गेम खेळल्याने 21 लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे त्याने आत्महत्याही केली. साजेश नावाच्या व्यक्तीलादेखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मी स्वतः देखील 6 लाख रुपये या गेमच्या व्यसनामुळे गमावले.
इतरही अनेक लोकांना यामुळे भरपूर नुकसान होते आहे अशा बाबी नमूद करत याचिकाकर्त्याने न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने या तिघांना नोटीस बजावली आहे.