नेवासा: संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सूचनेनुसार नेवासा तहसील कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील तलाठी कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्याची सूचना आमदार लंघे पाटील यांनी तहसीलदारांना केली. “गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांची प्रकरणे मार्गी लावली जातील, कोणालाही डोलच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नेवासा तालुक्यात अनेक महिन्यांपासून अनेक वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नव्हता. आधार कार्ड व्हेरिफिकेशन, बँक पासबुक, मोबाइल नंबर लिंकिंग यासह इतर अडचणी दूर करण्यासाठी आमदार लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत तहसीलदार डॉ. संजय बिरादार, शिवसेनेचे नेवासा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील वाघ, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. लक्ष्मणराव खांडाळे, युवा नेते ऋषिकेश शेटे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शोभा आलवणे, भाजपचे मंडल शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेश कडू, माजी सरपंच सतीश गायके, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, अध्यक्ष मोहन गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे आणि भाजपचे मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे उपस्थित होते.
आमदार लंघे पाटील म्हणाले, “काही लाभार्थ्यांना आधार डीबीटी आणि कॅन्सल झालेल्या आधार कार्डांमुळे अडचणी येत आहेत. अशा लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे बँकेत पैसे मिळावेत यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू. मी तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासा त्यांनी दिला. तसेच, राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी डोळ्याचा लाभ दीड हजारावरून अडीच हजार केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. योजनेच्या किचकट अटी कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले म्हणाले, “गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आधार व्हेरिफिकेशन आणि कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनेक लाभार्थी वंचित होते. आमदार लंघे पाटील यांनी कार्यशाळेच्या आयोजनाला संमती देत प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, याबद्दल त्यांचे आभार.”शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या, तर माजी अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी सर्वसामान्य आणि वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यशाळेत महसूल विभागाने कागदपत्र तपासणीसाठी विशेष कक्ष उभारले होते. तहसीलदार डॉ. संजय बिरादार स्वतः कागदपत्र तपासणीत सहभागी झाले. लाभार्थ्यांनी रांगेत उभे राहून कागदपत्रे तपासून घेतली.
कार्यशाळेमुळे तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. महसूल विभाग, समर्पण फाऊंडेशन आणि भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान, नेवासा महसूल प्रशासनांतर्गत योजना आणि पुरवठा विभागाची कामे रेंगाळत चालली आहेत. नागरिकांची कामे सुरळीत व्हावीत आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी आमदारांनी समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.





