पुणे | महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाकडून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणारे काम कौतुकास्पद असल्याच्या भावना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त व्यक्त केल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल बालवडकर यांच्यासह माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर फाउंडेशनचे सभासद व इतर मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मेळाव्यात या महिलांना योजनेची माहिती देण्यासह त्यांची नोंदणीही करण्यात आली, तसेच फाउंडेशनच्या वतीने नोंदणी करण्यात आलेल्या महिलांना भेट म्हणून साडीचे वाटपही करण्यात आले. कोथरूड येथील आशिष गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या योजनेसाठी महिलांना नोंदणी करण्यात अडचणी येणार नाहीत, तसेच नोंदणी करण्यासाठी लांब जावे लागू नये, या उद्देशाने फाउंडेशनच्या वतीने नोंदणीसाठी मोबाइल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली असून, त्या माध्यमातून जागेवरच नोंदणी केली जात आहे. फाउंडेशनच्या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या अन्य योजनाही जनतेपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.





