अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांचे पंतप्रधान असून त्यांंच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्यशासनाकडून तळागळातील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाणारे काम कौतूकास्पद असल्याच्या भावना माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त व्यक्त केल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कार्यक्रमाचे मुख्य संयोजन अमोल बालवडकर यांच्यासह माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर फाउंडेशन चे सभासद व इतर मान्यवर आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
मेळाव्यात या महिलांना या योजनेची माहिती देण्यासह त्यांची नोंदणीही करण्यात आली. तसेच फाऊंडेशनच्या वतीने नोंदणी करण्यात आलेल्या महिलांना भेट म्हणून साडीचे वाटपही करण्यात आले. कोथरूड मधील आशिष गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेसाठी महिलांना नोंदणी करण्यात अडचणी येणार नाहीत तसेच नोंदणी करण्यासाठी लांब जावे लागणार नाही या उद्देशाने फाऊंडेशनच्या वतीने नोंदणीसाठी मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्या माध्यमातून जागेवरच नोंदणी केली जात असून त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनाही जनते पर्यंत पोहचविल्या जात आहेत.

