Pimpri : कीर्तन महोत्सवास मावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव मावळ : ज्यांच्या अंतःकरणात सर्वार्थाने आनंदाची प्राप्ती झाली आहे. ज्यांच्या अंत:करणातून सर्व विकार निघून गेले आहेत. अशांना भाग्यवंत म्हटले आहे. जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे की ज्यांच्याकडे फुटकी कवडी पण नाही, जो फक्त लंगोटी धारण करतो त्यालाही भाग्यवंत म्हटले आहे. कारण त्या साधूच्या अंत:करणातून काम, क्रोध, लोभ हे विकार निघून गेलेले आहेत आणि आनंदाची सृष्टी झालेली आहे. तेच खरे भाग्यवंत होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार जयेश महाराज भाग्यवंत यांनी केले. कामशेत येथे श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित भव्य कीर्तन महोत्सवात हभप जयेश महाराज भाग्यवंत यांची गुरुवारी कीर्तनसेवा संपन्न झाली.
यावेळी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची विशेष उपस्थिती होती. सोबत आमदार सुनील शेळके, सारिका शेळके, संतोष दाभाडे, श्री विठ्ठल परिवार मावळचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, महिला भगिनी, वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतांकडे, साधूंकडे सर्वार्थाने आनंदाची प्राप्ती होते. अभिव्यक्ती होणे आणि अंत:करणातून विकार निघून जाणे याला तुकाराम महाराज खरे भाग्यवंत म्हणतात. आनंदाची सृष्टी होण्याकरिता पंढरीनाथाकडे शरण जावे. प्रपंच आनंद, सुख कधीच देत नाही. हे सर्व मान्य आहे. संसार दुःख मूळ आहे. त्यामुळे प्रपंचाला शरण जाऊ नका, तुम्हाला काहीच देणार नाही. त्यासाठी त्या पांडुरंगाकडे शरण जावे, असा उपदेश भाग्यवंत महाराजांनी केला.
तरुणांनी भजन करावे. भजन करणे म्हातारपणासाठी नाही तर त्याचा आनंद उतारवयात भोगावा. भजन करायला, गंध लावायला तरुणांनी लाजू नये. तरुणांनी आता संकल्प करावा, आपण आयटीत जगावं, आयटीत राहावे. महाराज म्हणाले, मीही आयटीत इंजिनियर आहे आणि कीर्तन आयटीत सांगतो आहे, अशी कोटी हभप भाग्यवंत महाराज यांनी केली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा कीर्तन महोत्सव ठरत असलेल्या कामशेत येथील या कीर्तन महोत्सवाला गुरुवारी (दि.२) राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विशेष उपस्थिती दाखविली. यावेळी आमदार सुनील शेळके, त्यांच्या पत्नी सारिका शेळके आणि हभप जयेश महाराज भाग्यवंत यांच्या हस्ते मंत्रीआदिती तटकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री तटकरे म्हणाल्या की, पुण्यवंतांच्या माध्यमातून मला ही सेवा घडली आणि संत ज्ञानोबा संत तुकोबाराय यांच्या भूमीत येण्याचा योग आला. यावेळी तटकरे यांनी सर्व मावळवासियांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.





