पिंपरी | रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खालापूर, (वार्ताहर) – पावसाळ्यात जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या तयार होत असतात. याच रानभाज्या विकून आदिवासी बांधवाचा उदरनिर्वाह होत असतो.आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असलेल्या रानभाज्यांची ओळख व्हावी,
जनजागृती व्हावी याकरिता खालापूर तालुका कृषी अधिकारी यांनी आत्मा उपक्रमाअंतर्गत खोपोली येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. खोपोली शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या महोत्सवाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रानभाज्यांची खरेदी केली.
रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन खोपोली ठाण्याचे पोलीस निरिक्षक शितल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात करटोली, सुरण, आघाडा, अळूची पाने, ओवा, बांबू, केळफुल, टाकळा, कौवळा, कुडा, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या रानभाज्या आणि पौष्टिक लाडू विक्रीस आणले होते.
महोत्सवात मिळवाडी, ताडवाडी, आडोशी, नारंगी, काजूवाडी, उंबरे, आडोशी, चिंचवली शेकिन, कांढरोली वनखळ, वावोशी, वणवे, नढाळवाडी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. पाककृती आदींबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी. आदिवासी समाजाला त्यापासून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी.
या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खालापूर तालुका कृषि अधिकारी सुनील निंबाळकर यांनी दिली.
या महोत्सवाचे संपूर्ण नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर येथील अधिकारी, कर्मचारी आणि आत्मा बी.टी.एम. श्रीमती प्रज्ञा यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोली येथील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन विविध रानभाज्यांची माहिती घेतली.





