विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा ।। संतांच्या पालख्यांचे पुणेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत.. लाखो वैष्णव विसावले

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या दर्शनाची पुणेकरांना सकाळपासूनच आस लागली होती. सजविलेल्या पालख्या डोळ्यात साठविण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. यंदाही लाखोंच्या संख्येत प्रकर्षाने वारकऱ्यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या घणघणाटासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह अक्षरओसंडून वाहत होता.
पाटील इस्टेट चौकात सायंकाळी 5.25 वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टिपथास पडला. रथातील तुकोबांची पालखी आणि त्यातील पादुका डोळ्यांना दिसल्या आणि भाविक कृतकृत्य झाले. काहींना पादुका दर्शनाचे भाग्य लाभले. तुकोबांच्या आगमनानंतर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भक्तांना एक तास वाट पाहावी लागली. सायंकाळी 6.35 वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
माउलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली. काहींनाच पादुकांचे दर्शन प्राप्त झाले. मात्र, सर्वांनीच धन्यत्वाचा अनुभव घेतला. पाटील इस्टेट चौकात तुकोबा व ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर फुलांची उधळण करण्यात आली. पालख्या संचेती चौकात आल्यानंतर दोन्ही पालख्यांवर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. त्यावेळी वारकऱ्यांनी माऊली… नामाचा एकच जयघोष केला.
वारकऱ्यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्गसन रस्त्यामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक येथे विसावला. तेथे ज्ञानोबा-तुकारामचा एकच गजर झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकातही पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. सबंध पालखी मार्गावर पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत दंग झाल्याचे दिसून आले.
उन्हामुळे काहीसा शीण
शहरात सकाळपासूनच ऊन पडले होते. दुपारी त्यात भर पडल्याने ऊन जाणवत होते. वाढलेल्या उन्हामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. अपवाद वगळता बहुतांश वेळा पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर वरुणराजा पालखी व वारकऱ्यांवर जलाभिषेक करत असतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी पालख्यांचे शहरात आगमन झाल्यावर वरूणराजाने हजेरी लावली नाही. राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात वरुणराजा बरसलाच नाही. वाढलेल्या उन्हामुळे वारकऱ्यांची चालण्याची गती मंदावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.





