श्रमिक मुक्ती दलात फूट ! डॉ. पाटणकरांच्या संघटनेशी फारकत घेत नव्या संघटनेची स्थापना

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलात फूट पडली आहे. कोयना धरणग्रस्तांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या संघटनेशी फारकत घेत कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना स्थापन केली आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनांचा वापर डॉ. पाटणकर यांनी चुकीच्या पद्धतीने केला. संघटना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा ठपका धरणग्रस्तांनी ठेवला आहे.
कोयना धरणग्रस्तांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत संघटनेला तिलांजली देऊन, धरणग्रस्तांनी डॉ. पाटणकर व श्रमिक मुक्ती दलाला सोडचिठ्ठी दिली आहे. नव्या संघटनेचे नेतृत्व चैतन्य दळवी, महेश शेलार व सचिन कदम करणार असून, ही संघटना राजकारणविरहीत काम करेल, असा विश्वास धरणग्रस्तांनी व्यक्त केला आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय आजही प्रलंबित आहे.
राजकारणविरहीत लढा असावा, यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या संघटनेमार्फत धरणग्रस्तांच्या तिसर्या पिढीने गेल्या दहा वर्षांपासून आंदोलने, उपोषण, लाँग मार्च आणि कोरोना काळात तोंडाला मास्क बांधून, घराच्या दारांमध्ये धरणे आंदोलन करून, शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. सांगली आणि सातारा जिल्ह्यात जमीन पसंतीसाठी अर्ज जमा केले होते. विविध गट, राजकीय पक्षांमध्ये विभागलेले धरणग्रस्त पुनर्वसनाचा तिढा सुटण्यासाठी एकत्र झाले होते. डॉ. पाटणकर यांनी धरणग्रस्तांनी बांधलेली मोट राष्ट्रवादीसारख्या राजकीय पक्षाला ताकद देण्यासाठी वापरली, या संशयावरून धरणग्रस्तांमधून उघड नाराजी व्यक्त होत होती.
लोकसभा निवडणुकीत धरणग्रस्तांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेऊनही, संघटनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. धरणग्रस्तांना भावानिक करून, त्यांचा वापर राजकारणासाठी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्तांनी वेगळी भूमिका घेतली आहे. यापुढे महाराष्ट्र राज्य कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेमार्फत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना कोयना धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा विषय राजकारणविरहीत लढ्यातून मार्गी लावायची इच्छा आहे, त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सात जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या कोयना धरणग्रस्तांची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे चैतन्य दळवी, सचिन कदम व महेश शेलार यांनी सांगितले.
या बैठकीला प्रवीण साळुंखे, विनायक शेलार, सीताराम पवार, अनिल देवरुखकर, सलिम शिकारी, शिवाजी कांबळे, निवृत्ती सपकाळ, आनंद ढमाळ, तानाजी बबले, नथुराम कोळेकर, डी.के.साळुंखे, जयराम कांबळे, परशुराम शिर्के, राजाराम जाधव, रामचंद्र कदम, धोंडीबा कदम आदी उपस्थित होते.





