पिंपरी | कान्हेतील साईबाबा सेवाधाम येथे ‘अध्यात्मिक गुरुकुल संस्कार वर्ग’

कान्हे, (वार्ताहर) – पूर्वी शिक्षणासाठी गुरुकुल आश्रम ही पद्धत होती. गुरुकुलात मुख्य गुरु असत, जे ग्रंथविद्या आणि अन्य अध्यात्मिक संस्कार विद्यार्थ्यांवर करत होते. आपण अनेकदा असे ऐकतो की, भगवान प्रभू श्रीराम हे गुरु वसिष्ट तर भगवान श्रीकृष्ण हे गुरु संदीपानी यांच्याकडे विद्या शिकले.
गुरुकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अपोआपच चांगले जीवन जगण्याचे संस्कार होत होते. सध्याच्या काळात मात्र मुलांवर अध्यात्मिक संस्कार होताना दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात कान्हे येथे साईबाबा सेवाधाम मध्ये ‘अध्यात्मिक गुरुकुल संस्कार वर्ग’ सुरु करण्यात आला आहे.
रविवारी पंडित किरण परळीकर, वारकरी आघाडीचे संतोष कुंभार, अभिमन्यू शिंदे, हभप बाळासाहेब महाराज जांभुळकर यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून अध्यात्मिक गुरुकुल संस्कार वर्गाचा आरंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुकुलास शुभेच्छा दिल्या. तसेच अधिकाधिक बालकांना गुरुकुल संस्कार वर्गात पाठविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शांताराम जगताप, आनंद नवघणे, दत्ता महाराज शिंदे, सागर भुंडे, चांदगुडे साहेब, काळुराम आंद्रे, प्रतीक म्हाळसकर, राजाराम असवले, दत्ता महाराज केदारी उपस्थित होते. हभप मोगरवाडीकर यांनी कार्याला आशीर्वाद दिले.
दत्ता महाराज हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश महाराज जांभळे यांनी सूत्रसंचालन केले. तर, कार्यक्रमाचे नियोजन किसन महाराज केदारी आणि गोपीचंद महाराज कचरे यांनी केले.
असा असेल गुरुकुल संस्कार वर्ग
प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत गुरुकुल संस्कार वर्ग साईबाबा सेवाधाम कान्हे येथे होणार आहे. यामध्ये संस्कृतपाठ, अध्यात्मिक पाठ, संत साहित्य, मृदंग वादन, प्रवचन, कीर्तन,
श्रीमत भगवद्गीता सह विविध संत चरित्र, ग्रंथ आणि स्त्रोत यांचे पाठ शिकविले जाणार आहे. शिक्षक वृंद मध्ये किरण परळीकर, दत्तात्रय महाराज हजारे, गोपीचंद महाराज कचरे, किसन महाराज केदारी, गणेश महाराज जांभळे, लक्ष्मण भाऊ सातकर असणार आहेत. संस्कार वर्गाच्या उद्घाटनादिवशीच अनेक मुलांची नोंद करण्यात आली.





