श्रीनगर : स्पाइसजेट एअरलाइनने २६ जुलै २०२५ रोजी श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या त्यांच्या एका विमानात एका प्रवाशाने त्यांच्या चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे. कर्मचाऱ्यांना इतकी मारहाण करण्यात आली की, एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आणि एका कर्मचाऱ्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. पीडितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअरलाइनने सरकारला पत्र लिहून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, २६ जुलै २०२५ रोजी श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक एसजी-३८६ च्या बोर्डिंग गेटवर एका प्रवाशाने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर गंभीर हल्ला केला. कर्मचाऱ्यांवर लाथा-बुक्क्यांनी आणि रांगेत उभे राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टँडने हल्ला करण्यात आला. एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, परंतु त्यानंतरही प्रवाशाने त्याला लाथा-बुक्क्या मारणे सुरूच ठेवले. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला जबड्यावर जोरदार लाथ मारल्याने त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. जखमी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रवासी हा एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. काय होते नेमके प्रकरण? “वरिष्ठ लष्करी अधिकारी असलेल्या प्रवाशाकडे एकूण १६ किलो वजनाचे दोन केबिन बॅगेज होते, जे की परवानगी असलेल्या ७ किलो वजनाच्या मर्यादेच्या दुपटीपेक्षाही जास्त होते. जेव्हा त्यांना नम्रपणे त्यांच्याकडील अतिरिक्त बॅगेजबद्दल सांगण्यात आले आणि त्यासाठी लागू असलेले शुल्क भरण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांनी नकार दिला आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीने एरोब्रिजमध्ये प्रवेश केला, हे एक विमान सुरक्षा नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यांना सीआयएसएफ अधिकाऱ्याने परत गेटकडे आणले,” असे निवेदनात म्हटले आहे.गेटवर आणल्यानंतर प्रवासी जास्तच आक्रमक झाला आणि त्याने विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफच्या चार सदस्यांवर हल्ला केला, असेही कंपनीने म्हटले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि विमान कंपनीने नागरी विमान वाहतूक नियमांनुसार प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्पाईसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि प्रवाशाविरुद्ध योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.