वडगाव मावळ (वार्ताहर) – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ऊर्से टोलनाक्यावरील वाहनांचा प्रतिक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) कमी करण्यासाठी हा टोलनाका मुंबईच्या बाजूला सुमारे दोन किलोमीटर पुढे हलविण्याचे काम वेगात सुरू आहे. टोलनाक्यावर वाहनांसाठी २८ मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. तत्कालीन शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळातील महत्वाकांक्षी असा देशातील पहिला प्रतिबंधित द्रुतगती मार्ग म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची नोंद होते. सुमारे बावीसशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम १९९७ मध्ये सुरू झाले. २००१ मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. पुणे बाजूला किवळे येथून हा मार्ग सुरू होतो. या द्रुतगती मार्गावर तळेगाव (ऊर्से) आणि घाटाखाली खालापूर येथे असे दोन टोल नाके उभारण्यात आले. सद्यस्थितीत ऊर्से टोलनाक्यावर वाहनांसाठी १४ मार्गिका (लेन) आहेत. जागा बदलण्याची कारणे दिवसेंदिवस द्रूतगती मार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच सुट्ट्यांच्या काळात टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा. परिणामी वाहनचालकांच्या वेळेचा व इंधनाचा अपव्यय होतो. तर, आगामी काळात याच परिसरातून रिंगरोडही जाणार असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास कोंडीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलनाक्यावरील वाहनांचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी ऊर्से टोलनाका मुंबईच्या दिशेला पुढे दोन किलोमीटर अंतरावर हलविला जाणार असून गेल्या काही महिन्यांपासून ऊर्से गावच्या हद्दीतच नवीन टोल नाका उभारण्याचे काम सुरू आहे. नवीन टोलनाक्यामुळे अडचणी – नवीन टोलनाक्याच्या रस्त्याचे रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई – स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीमधील सेवा रस्ते व भुयारी मार्ग बंद. – रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने महामार्ग ओलांडताना कसरत. – टोलनाक्यासाठी डोंगर फोडून करून रुंदीकरण. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका.