Torres scam : ‘टोरेस’ घोटाळ्यातील तपासाला वेग; आणखी तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Torres scam – टोरेस कंपनीने 13 हजारहून अधिक कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईसह आसपासच्या अनेकांनी या टोरेस कंपनीत आपले पैसे गुंतवले होते. पण या कंपनीने नागरिकांना अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भाईंदरमधील टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या तिघांना पोलीस स्टेशनला हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि ज्या वक्तीच्या नावाने ऑफिस भाड्यावर घेतले, त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी यादव (23), नितीन लखवानी (47),आणि मोहम्मद मोईजुद्दीन नझरुद्दीन खालिद शेख (50) या तीन जणांना नवघर पोलिसांनी अटक केली.
टोरेस घोटाळा प्रकरणी एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असून ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करुन त्यांना ठाणे कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





