Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ‘गती’ची क्रांती ! राज्यातील सर्वात लांब बोगदा आजपासून सुरू, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये….

Samruddhi Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या अखेरच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं गुरुवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महायुतीतील अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
या टप्प्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत पार करता येणार आहे. या टप्प्यात एकूण 5 बोगदे असून, यातील 8 किलोमीटर लांबीचा बोगदा राज्यातील सर्वात मोठा आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होणाऱ्या या भव्य बोगद्याच्या काही खास वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊया.
राज्यातील सर्वात लांब बोगद्याची वैशिष्ट्ये :
- 8 किमी लांब, 17.5 मीटर रुंद, 9 मीटर उंच बोगदा
- 3 लेनचे वाहनमार्ग, जिथे ताशी 100 किमी वेगाने प्रवास शक्य
- भिंतींना फायर प्रोटेक्शन आणि लाईट रिफ्लेक्शन फिनिशिंग
- प्रत्येक 300 मीटरला 26 क्रॉस पॅसेज – आपत्कालीन बाहेर पडण्याची सोय
- प्रत्येक 90 मीटरला अग्निरोधक यंत्रणा – वाहनाला आग लागल्यास अॅक्टिवेट होणारा अॅटोमॅटिक स्प्रिंकल सिस्टिम (देशात पहिल्यांदाच वापरलेलं तंत्रज्ञान – डेन्मार्कहून मागवलेले)
- 572 अग्निसुरक्षा झोन, प्रत्येकी 24 मीटरचा
- 100 रिव्हर्सिबल व्हेंटिलेशन फॅन्स – धूर बाहेर टाकण्यासाठी
अखेर नागपूर-मुंबई 8 तासांत शक्य!
- 11 डिसेंबर 2022: नागपूर ते शिर्डी (520 किमी) टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
- 26 मे 2023: शिर्डी ते भरवीर (80 किमी) टप्प्याचं उद्घाटन
- 4 मार्च 2024: भरवीर ते इगतपुरी (25 किमी) टप्पा सुरु
यामुळे नागपूर ते इगतपुरी प्रवास आता अधिक वेगवान झाला. मात्र नागपूर ते मुंबई थेट 8 तासांत प्रवासासाठी इगतपुरी ते आमणे (76 किमी) हा शेवटचा टप्पा उघडणे अत्यावश्यक होतं. 5 जूनपासून अखेर हा टप्पा सुरू होत असल्याने, समृद्धी महामार्गाचा संपूर्ण प्रवास आता प्रवाशांसाठी खुला होत आहे. लोकार्पणानंतर काही तासांतच हा टप्पा वाहतुकीसाठी अधिकृतपणे सुरु होणार आहे.





