मोसंबीचा आंबेबहार हंगाम दोन महिने आधीच संपणार

पुणे – जास्त झालेल्या पावसाचा फटका मोसंबीच्या पिकाला बसला आहे. यावर्षी दोन महिने आधीच मोसंबीचा आंबेबहार हंगाम संपणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या मोसंबीची आवक कमी होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या 20 टक्के भाव जास्त मिळत आहे. डिसेंबरमध्ये भावामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी वर्तविला आहे.
दरवर्षी आंबेबहार हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो. तो फेब्रुवारीपर्यंत असतो. मात्र, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. पावसाबरोबरच माशी नावाच्या रोगाचाही फटका मोसंबीच्या उत्पादनाला बसला आहे. उत्पादन घटले आहे. मागील वर्षी यावेळेस बाजारात दररोज 70 ते 80 टन मोसंबीची आवक होत असते. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 40 ते 50 टन आवक होत आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातून ही आवक होत आहे. उत्पन्नाबरोबरच फळाच्या दर्जालाही फटका बसला आहे. फळाला कलर कमी असलेल्या हिरव्या मोसंबीचे प्रमाण अधिक आहे. गोडीही नेहमीच्या तुलनेत कमी आहे. घाऊक बाजारात 3 डझनास 150 ते 320 रुपये, तर 4 डझनास 60 ते 130 रुपये भाव मिळत आहे. हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के जास्त असल्याचेही ढमढेरे यांनी नमुद केले.
जानेवारीमध्ये मृगबहार हंगाम सुरू होणार आहे. या हंगामातही नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. डिसेंबरमध्ये तर मोसंबीचे भाव 500 ते 1000 रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.





