पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला एका भव्य विश्वविक्रमाच्या नोंदीने झाली. ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’ हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित करून पुणेकरांनी भारतातील बोलीभाषा आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा विश्वविक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला आदरांजली असल्याचे मत तज्ज्ञांनी या विशेष कार्यक्रमात व्यक्त केले. १६७८ पोस्टर्सचा नवा विक्रम पुणे पुस्तक महोत्सव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि राईज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा विक्रम नोंदवण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे स्वप्नील डांगरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’चा यापूर्वीचा विश्वविक्रम अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये १३६५ पोस्टर्सच्या साहाय्याने हा विक्रम केला होता. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवात १६७८ पोस्टर्स प्रदर्शित करून हा विक्रम मोडीत काढण्यात आला आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले. बिरसा मुंडा आणि बोलीभाषेचा सन्मान महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आदिवासी समाजासाठी अतुलनीय कार्य केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी लाखो आदिवासी शब्दांच्या साहाय्याने हे १६७८ पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, ऋषिकेश खिलारे, अर्चना खिलारे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते. गिरीश प्रभुणे म्हणाले, बिरसा मुंडा यांचे कार्य बहुआयामी होते. त्यांनी केवळ १०-१५ वर्षांच्या काळात धर्मांतराविरोधात आदिवासींमध्ये चेतना निर्माण केली आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी उभे राहणारे ते पहिले होते. सध्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, बोलीभाषा तर मृतप्राय होत आहेत. अशा वेळी आदिवासी बोलीभाषा देवनागरी लिपीत लिहिल्यास ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल, यासाठी हे दालन एक मोठी सुरुवात ठरेल.