विशेष : नेत्रदानातून प्रकाशाकडे…
भारतात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा कालावधी नेत्रदान (Eye Donation) पंधरवडा म्हणून पाळला जातो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी 25 ऑगस्ट 1986 रोजी नेत्रदानाचा अर्ज भरला होता. त्यामुळे हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो.

– मनोज दिसले
Eye Donation : भारतात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा कालावधी नेत्रदान (Eye Donation) पंधरवडा म्हणून पाळला जातो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी 25 ऑगस्ट 1986 रोजी नेत्रदानाचा अर्ज भरला होता. त्यामुळे हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो.
.
‘नेत्रदान पंधरवडा’ या 15 दिवसांत (Eye Donation) देशात सर्वत्र विविध माध्यमांद्वारे नेत्रदानाबद्दल जनजागृतीचे काम केले जाते. गैरसमजुती आणि नेत्रदानाविषयी अनास्था यामुळे अजूनही आपल्याकडे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. आपलेच लाखो अंध बांधव नेत्रदानाकडे डोळे लावून बसले आहेत. आपणच त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण देऊ शकता.
जगात सुमारे 4 कोटी लोक अंध आहेत त्यातील 25% म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त लोक भारतात आहेत. त्यातील 30 लाखांपेक्षा जास्त व्यक्ती कॉर्निअल म्हणजेच बुबुळातील दोषामुळे अंध झालेले आहेत. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण जास्त आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी साधारण एक ते दीड लाख जणांना नेत्ररोपणाची आवश्यकता असते; पण त्यासाठी फक्त 55 ते 60 हजार पुढे येतात.
डोळ्याच्या बुबुळाचा गोलाकार पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निआ होय. कोणत्याही आजाराने, जखमेमुळे किंवा पोषक आहाराच्या कमतरतेमुळे हा भाग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा अंधत्व येते. याला बुबुळाचे अंधत्व असे म्हणतात. हे अंधत्व केवळ कॉर्निअल रोपण या शस्त्रक्रियेनेच आपण दूर करू शकतो. आज विज्ञान एवढे पुढारलेले आहे तरीही आपण अजून कृत्रिम कॉर्निआ कमी खर्चात बनवू शकलो नाही. जे उपलब्ध आहेत त्याची किंमत जास्त आहे आणि गुणवत्ता समाधानकारक नाही त्यामुळे आपल्याला नेत्रदानावरच विसंबून राहावे लागते.
कोणत्याही धर्माची, वयाची, चष्मा असलेली, मोतीबिंदू असणारी, मधुमेही, उच्च रक्तदाब असणारी व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करू शकते. फक्त या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानासाठी संमती असणे गरजेचे असते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आतच नेत्रदान करावे लागते. पुण्यात अनेक नेत्र पेढ्या आहेत. पुण्यातील 21 नेत्र पेढ्यांपैकी पाच नेत्र पेढ्या अग्रस्थानी आहेत. इतर नेत्र पेढ्यांचेही योगदान वाढले पाहिजे तसेच त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नेत्रदानाच्या (Eye Donation) बाबतीत आपण आपल्या शेजारील श्रीलंकेपेक्षाही खूप मागे आहोत, ही आपल्या सर्वांसाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आपली लोकसंख्या 150 कोटी तर श्रीलंकेची दोन ते तीन कोटी आहे. श्रीलंकेमध्ये डोळे ही राष्ट्रीय संपत्ती मानून मृत्यूनंतर डोळे काढून घेतले जात असल्याने देशांतर्गत गरज भागवून ते डोळे निर्यात करतात.
श्रीलंकेत हे होऊ शकते तर भारतात का नाही? आता भारतातही असा कायदा करण्याची वेळ आलेली आहे. भारतात दरवर्षी 70 ते 80 लाख नागरिकांचा मृत्यू होतो त्यातील फक्त 25 ते 30 हजार लोकच नेत्रदान करतात. नेत्रदानाचा कायदा केला तर लाखोंनी डोळे उपलब्ध होऊन आपली गरज भागवून आपणही डोळे
निर्यात करू शकू.
कायदा होण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण सर्वांनीच मरणोत्तर नेत्रदान करून नेत्रदान चळवळीला अंधत्व निवारणाला हातभार लावला पाहिजे. प्रथम आपण मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्धार करून आपल्या जवळच्या लांबच्या नातेवाईकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यास प्रभावित करा. आपल्या नात्यातील ओळखीतील एखाद्याचा मृत्यू झाल्यास आपण त्याच्या कुटुंबीयांनाही नेत्रदानाचा पर्याय सुचवू शकतो.
मध्य प्रदेशातील राजस्थान बॉर्डरवरील नीमच हे छोटेसे शहर भारताचे नेत्रदानाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरात भारतात दरडोई नेत्रदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील सर्व शहरांनी नीमच शहराचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या परिसरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर प्रथम त्याचे नेत्रदान करायचे आणि नंतर अंत्यविधी हे सर्व भारतीयांनी ठरविले तरच आपले अंधत्व निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य होईल.
ईबीएआय आणि भारत सरकार यांच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये भारतात 47 हजार 676 कॉर्निआ नेत्रदानातून उपलब्ध झाले. त्यातील 29 हजार 57 कॉर्निअल रोपण शस्त्रक्रियेसाठी वापरले गेले. म्हणजेच भारतात वर्षाला एक लाख कॉर्निअल रोपण शस्त्रक्रियेपेक्षा फारच कमी आहे. बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या देशाला दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त कॉर्नियाची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात 50 हजारच नेत्रदानातून उपलब्ध होतात.
मृत्यूचा दाखला देणार्या डॉक्टरांनीच मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच महापालिकेने मृत्यू दाखल्यावर नेत्रदान सुचविणारे किंवा नेत्रदानाबद्दलचे सुविचार छापावे. सर्व धर्मांच्या अंत्यविधी करणार्या पुरोहितांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नेत्रदानाबद्दल माहिती देऊन नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणे शक्य आहे.
आपल्या वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या तसेच आपल्या मुलांच्या वाढदिवशी आपण स्वतः मरणोत्तर नेत्रदानाचे इच्छापत्र भरून चांगला संकल्प करू शकता. अशाप्रकारे नेत्रदानाची चळवळ चालवून आपण जगातील सर्वात जास्त अंधांचा देश अशी आपली प्रतिमा मोडून काढली पाहिजे.नेत्रदानासंबंधी इच्छुक व्यक्ती आपल्या घराजवळील नेत्रपेढीत जाऊन नेत्रदानाचे इच्छापत्र घेऊ शकतात.
हे इच्छापत्र भरून त्यावर आपल्या वारसदाराची किंवा जवळच्या नातेवाईकांची शक्यतो पत्नी, मुलगा किंवा मुलगी व फॅमिली डॉक्टर यांच्या सह्या घ्याव्या लागतात. कारण या व्यक्तीच मृत्यू समयी उपस्थित असतात. ते नेत्रपेढीस (Eye Donation) कळवू शकतात. अशा प्रकारे नेत्रदानाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्या कुटुंबीयांचा सहभाग निश्चित केल्याने मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू शकते.






