विशेष: क्रीडा दिनाचा प्रसार व्हावा

– संतोष रामचंद्र थोरात
आज 29 ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद या महान हॉकीपटूचा जन्मदिवस आपल्या देशात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…
आजच्या दिवशीच सन 1905 मध्ये भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे जन्म झाला होता. क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळावी तसेच खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या महान हॉकीपटूचा जन्मदिवस आपल्या देशात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे. खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. खेळ आणि व्यक्ती यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो.
काही लोक खेळात करिअर करण्याबरोबर आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यातही आनंद घेतात.स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये आपले प्राविण्य जगाला दाखवून दिलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशात अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये कबड्डी, मॅरेथॉन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी आणि इतर अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे युवा खेळाडूंना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे. यामुळे तो तंदुरुस्त राहू शकतो.
खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. जीवनातील व्यथा व चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम आणि शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा विकास होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूवृत्ती इत्यादी गुणांची वाढ होते.सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो.
आपल्या देशात खेळाला प्रोत्साहन मिळत आहे. जिथे एक काळ होता जेव्हा आई-वडील आपल्या मुलांना खेळण्यास मनाई करत शिक्षणावर लक्ष देण्याचा सल्ला देत असायचे, तिथे आज तेही आपल्या मुलांना देशासाठी खेळावे अशी तयारी ठेवतात. व्यक्तीचा विकास, देशाचे नाव, गौरव आणि प्रगतीसह व्यक्तीला चांगलं आयुष्य बनवण्याची संधीसुद्धा मिळते.खेळाच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात.
आपल्या देशात हॉकी व क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळांच्या स्थानिक, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणार्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ नेहमीच अव्वल राहिला आहे. मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला होता आणि हॉकीमध्ये देशाला सुवर्णपदके मिळवून दिली होती.
मैदानात हॉकीस्टिकने चेंडूला नियंत्रित करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हटले जाते. ते हॉकीस्टिक घेऊन जेव्हा जेव्हा मैदानावर यायचे तेव्हा चेंडू पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात असायचा. केवळ भारतच नाही, तर जगातील अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले होते. मेजर ध्यानचंद यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हॉकीसाठी समर्पित केल्याबद्दल त्यांना 1956 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात देशाचे राष्ट्रपती हे क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करतात.
मानवाची शारीरिक क्षमता विकसित करणे आणि आरोग्य निरोगी राखणे खेळामुळे शक्य होऊ शकते. आजच्या आधुनिक युगात माणूस धकाधकीचे आयुष्य जगत आहे. माणसाला आरोग्याकडे लक्ष देण्याससुद्धा वेळ नाही. आजच्या या आधुनिक युगात खेळाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले आहे. भारतात देखील प्राचीन काळी कुस्ती, मल्लखांब, विविध मैदानी खेळ यांच्या स्पर्धा भरवल्या जात. राजे-महाराजे खेळांना आश्रय देत.त्याकाळी खेळांचे महत्त्व लोकांनी जाणले होते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना खेळाचे महत्त्व पटवावे म्हणून सध्या सरकारी व खासगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे.
सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये खेळांडूसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तरी दुर्दैवाने आपण खेळाचे महत्त्व विसरत चाललो आहोत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना भारतासारख्या देशाची दमछाक होताना दिसून येते. याकरिता आपण मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे. देशातील मुलांना शालेय स्तरापासून खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करून भारताला सुवर्णयुगाची अनुभूती देणार्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक हॉकीपटू भारतात निर्माण व्हायला हवेत.





