Newasa News : नेवाशात विशेष पोलीस पथकाची गौणखनिज तस्करीवर धडक कारवाई

नेवासा : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बुधवारी (दि. 25 जून 2025) दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर सिनेस्टाईल पद्धतीने धडक कारवाई केली.
या कारवाईत 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळूसह एकूण 75 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नेवासा पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेशांतर करून संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतुकीवर प्रथम कारवाई केली आणि काही मिनिटांतच गोधेगाव गाठत दुसरी मोठी कारवाई करून तस्करांना चांगलाच दणका दिला.
गोधेगावात साठवलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या सहकार्यानेही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाळूतस्कर आणि अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असून, “खाडे आले रे… खाडे आले!” अशी हाकाटी पसरली.
वेशांतरात ट्रॅक्टर चालवत खाडेंची धडाकेबाज कारवाई
कारवाईनंतर स्वत: पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेशांतरात ट्रॅक्टर चालवत वाहने जप्त केली. त्यांच्या या धाडसी आणि चपळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाळूतस्करीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यात विशेष पोलीस पथकाची धास्ती पुन्हा एकदा अवैध धंदे चालकांमध्ये पसरली आहे.





