बिहारला विशेष राज्याच्या दर्जाऐवजी विशेष मदत! नितीश कुमार यांनी व्यक्त केले समाधान

पाटणा : बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने अमान्य केली. तसे असले तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात राज्याला विशेष मदतीची तरतूद करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूकडून सातत्याने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी पुढे करण्यात आली.
मात्र, ती मागणी मान्य होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी नितीश यांना लक्ष्य केले. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी तर थेट नितीश यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अशात केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी घसघशीत निधीची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी नितीश यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
तांत्रिक कारणांस्तव विशेष दर्जा शक्य नसेल; तर बिहारला विशेष मदत मिळावी असा प्रस्ताव आम्ही दिला होता. तशा प्रकारची मदत आता जाहीर झाली, असे नितीश यांनी विशेष दर्जाची मागणी सोडून देणार का या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले. केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी समाधानी आहात का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.





