विशेष : युगप्रवर्तक साहित्यिक
मराठी भाषेतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि. स. खांडेकर (V.S.Khandekar) यांचा आज 2 सप्टेंबर रोजी 50 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त...

– अमेय गुप्ते
V.S.Khandekar : मराठी भाषेतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि. स. खांडेकर (V.S.Khandekar) यांचा आज 2 सप्टेंबर रोजी 50 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त…
मराठी साहित्य, चित्रपट या प्रकारात आपला स्वतंत्र ठसा उमटवून आपल्या लीलया लेखणीने वाचकांना खिळवून साहित्याद्वारे आनंद देणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे वि. स. खांडेकर! ते भाऊसाहेब खांडेकर या नावाने जनमनात परिचित होते.
पूर्वीच्या सांगली संस्थानातील प्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिराच्या आवारातील घरात 11 जानेवारी 1898 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव ‘गणेश आत्माराम खांडेकर’ असून ते त्यांच्या काकांच्या (V.S.Khandekar) घरी लहानपणी दत्तक गेल्यामुळे ‘विष्णू सखाराम खांडेकर’ असे त्यांचे नाव झाले. बालपणापासून त्यांना वाचनाचा व्यासंग असल्याने, त्यांनी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके वाचली होती. मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करून त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
त्यावेळी ते पुणे येथील शालूकर बोळात असलेल्या सांगलीकर वाड्यात राहात असत. याच सुमारास त्यांची व भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची भेट झाली. एकदा गडकरी यांनी बालगंधर्वांना ‘हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस’ अशी भाऊसाहेबांची ओळख करून दिली. त्यामुळे गडकरी यांच्या संदर्भात ‘गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय’ हे पुस्तक लिहिले.
1914 मध्ये त्यांनी ‘रमणीरत्न’ हे पहिले नाटक लिहून मराठी रंगभूमीवर आपले दमदार पाउल टाकले. भाऊसाहेबांचे लेखन हे मनाच्या गाभार्यात अखंड तेवणार्या नंदादीपाप्रमाणे होते. त्यामुळे त्यांच्या जीवन, कार्य, मूल्य, विचार, साहित्यिक दृष्टिकोन या बहुविध गुणांविषयी जणू एक व्यापक आकलन सर्वांच्या दृष्टीस पडते. माणूस म्हणून ते जितके मोठे होते तेवढे त्याचे साहित्यही (V.S.Khandekar) मानवधर्मी म्हणून मोठे आहे.
मानवी जीवनात नशीब आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर प्रकाश टाकताना भाऊसाहेब एका ठिकाणी अत्यंत मार्मिकपणे म्हणतात, संधीचे घोडं जर दारात आलं, तर त्याच्या पाठीवर टांग मारून बसता आलं पाहिजे. तो घोडा दारात येणं हे नशिबाचं काम असतं, पण त्याच्या पाठीवर बसणं हे स्वतःच्या कर्तृत्वाचं काम असतं!
भाऊसाहेबांचा हा विचार मानवी मनाला आळस झटकून कर्मप्रवृत्त होण्याची प्रेरणा देतो. आयुष्यात अनेकदा संधी अनपेक्षितपणे दाराशी चालून येते, परंतु केवळ संधी मिळणे पुरेसे नसते, तर त्या संधीचे सोने करण्यासाठी अंगी ध्येयवेडेपणा, मेहनत आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. जो माणूस वेळेचे भान ठेवून त्या संधीवर स्वार होतो, तोच यशाचे शिखर गाठू शकतो असे ते म्हणत असत.
1920 मध्ये ते शिरोडे येथील ट्युटोरियल हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी बाल्यावस्थेत असलेल्या त्या शाळेला भाऊसाहेबांनी जणू सरस्वतीचे मंदिर बनवले. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना जणू आईप्रमाणे जीव लावला. शाळेच्या मदतीसाठी त्यांनी ‘स्वराज्याचे ताट’ हे नाटक लिहून जमलेल्या पैशातून शाळेची नवी इमारत उभी केली. सावंतवाडी येथील ‘वैनतेय’ या संपादक घनश्याम आजगावकर यांच्या साप्ताहिकात भाऊसाहेबांनी 1924 ते 1937 या काळात लेखन केले. या साप्ताहिकात त्यांनी सुमारे पावणेदोनशे लेख लिहिले.
1928 मध्ये त्यांचे ‘रंकाचे राज्य’ हे संगीत नाटक पुस्तक रूपात प्रसिद्ध झाले. या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथील नाट्यकला प्रसारक मंडळी यांनी सदासुख नाट्यगृहात 16 मे 1928 रोजी सादर केला. 1959 मध्ये यांनी ‘ययाती’ ही कादंबरी लिहून भारतीय साहित्य विश्वात आपलं स्थान एखाद्या ज्ञानतपस्वीप्रमाणे अढळ केलं. या कादंबरीस 1960 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला. 1968 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारतीय भाषांमध्ये मानाचा समजला जाणार्या 1974च्या ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’चे ते मराठी भाषेचे पहिले मानकरी ठरले. 1941 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे तर 1957 मध्ये सातारा येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे खांडेकर यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
अमृतवेल, पहिलं प्रेम, मध्यरात्र, उल्का, सुखाचा शोध, अश्रू, अबोली, सांजवात, क्रौंचवध, हिरवा चाफा, दवबिंदू, मुक्या कळ्या, पाकळ्या, धुके, घरटे, पांढरे ढग, प्रीतीचा शोध, फुले आणि दगड, रिकामा देव्हारा, मुखवटे, पहिली पावलं, तारका, सूर्यास्त, तिसरा प्रहार अशी त्यांची दर्जेदार साहित्यसंपदा आहे. त्यांच्या इतर सर्व साहित्याची इंग्रज, हिंदी, रशियन, मल्याळी, तेलगू, कन्नड, गुजराथी अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
कोल्हापूर येथील राजारामपुरी येथील नंदादीप बंगल्यात त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. आपल्या अधू दृष्टीवर मात करत त्यांनी (V.S.Khandekar) सुमारे 17 कादंबर्या, 38 कथासंग्रह, 11 लघुनिबंध संग्रह, 3 रूपककथा संग्रह, 1 प्रस्तावना संग्रह, 8 लेखसंग्रह, 4 व्यक्ती आणि वाङ्मय ग्रंथ, 2 व्यक्तिचित्रे, 1 चरित्र, 3 अनुवादित रूपककथा, 1 अनुवादित पत्रसंग्रह, 3 भाषण संग्रह, 1 मुलाखत संग्रह, 1 नाटक, 14 मराठी चित्रपट कथा, 10 हिंदी चित्रपट कथा तसेच 8 संपादित कथासंग्रह, 3 संपादित कादंबर्या, 4 लघुनिबंध संग्रह, 2 निबंध संग्रह, 3 संपादित काव्य संग्रह, 3 नाट्य समीक्षात्मक पुस्तके, 1 गद्य-पद्य संग्रह, 2 गौरवग्रंथ अशी दर्जेदार साहित्य संपदा निर्माण करणार्या वि. स. खांडेकर यांचे वयाच्या 78व्या वर्षी 2 सप्टेंबर 1976 रोजी मिरज येथे निधन झाले.






