Nagar: जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सभापतीची भूमिका महत्त्वाची: सभापती प्रा. राम शिंदे

नेवासा – देशाची खरी लोकशाही ही राज्यात विधानसभा व विधान परिषद आणि देशात लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी असते. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे न्याय मंदिर आहे. या ठिकणी उजव्या बाजूला सत्ताधारी व डाव्या बाजूला विरोधी पक्ष आणि या दोघांचा दुवा म्हणून सभापतीची भूमिका महत्वाची ठरते. वंचित आणि अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सभापतीची भूमिका ही महत्त्वाची असते, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर (काका) शिंदे यांनी महायुतीमध्ये निवडून आलेल्या जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार व नेवासा तालुक्यातील मतदारांचे जाहीर आभार कार्यक्रमाचे आयोजन नेवासा येथील आराध्य मंगल कार्यालयामध्ये केले होते. यावेळी सभापती शिंदे बोलत होते.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विजय शिवतारे, आ. काशीनाथ दाते, आ.अमोल खताळ, आ. विक्रम पाचपुते, आ. विठ्ठलराव लंघे पाटील,पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे, उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शेतकरी संघटनेचे अजित काळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, संभाजी दहातोंडे, किसनराव गडाख, राष्ट्रवादीचे युवानेते अब्दुल शेख आदीउ पस्थित होते.
शिंदे यांनी आपल्या खास शैलीत आमदारांची कहाणी सांगितली. आमदार काशिनाथ दाते यांना बळजबरीने तिकिट दिले. आमदार विक्रम पाचपुते यांना तिकीटच नव्हते तर संगमनेरमध्ये नेमका पराभव कोणाचा व विजय कोणाचा हेच समजत नव्हते. हा तिकडे झालेला पराभव देखील एक रेकॉर्ड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की, ज्ञानेश्वर मंदिराचा आराखडा इतका उत्कृष्ट असेल की इथे राज्यात नव्हे देशात नाव निघेल. राज्यात प्रचंड बहुमताने आलेले सरकार ही लाट नसून लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. हे सरकार आश्वासन देणारे नसून काम करणारे सरकार आहे. देशात किंवा राज्यात असा एकही शेतकरी नसेल किंवा असे एकही कुटुंब नसेल की त्या व्यक्तीला सरकारचा फायदा झालेला नसेल. प्रत्येक कुटुंबाला योजनेच्या माध्यमातून पैसे मिळाले. येथे सुद्धा शनिदेव असून, भावी मंत्र्यांचे बोर्ड लावणाऱ्यांचा पराभव होऊन तालुका हा दहशतमुक्त, वाळूमाफिया मुक्त झालेला असून यापुढील काळात येथे विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून विकासाचा डोंगर उभा राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला शिवसेना तालुकाध्यक्ष सुरेश डिके, शिवसेना विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, अशोक करडक, अंकुश काळे, ऋषिकेश शेटे, प्रताप शिंदे, डॉ.बाळासाहेब कोलते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत करडक यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर पेचे यांनी आभार मानले.





