टोकियो : अंतराळात विविध ठिकाणी तरंगणारे नऊ लाख विविध प्रकारचे तुकडे बाजूला करून अंतराळातील हा कचरा हटवण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. चुंबकीय तंत्रज्ञान, लेझर तंत्रज्ञानासह यंत्रमानवाचाही वापर त्यासाठी केला जाणार आहे.
सध्या अंतरालाट आठ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने नऊ लाख तुकडे फिरत आहेत. गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये जे उपग्रह अंतराळात नष्ट झाले त्या उपग्रहांचे हे तूकडे आहेत. अंतराळातील हा कचरा आगामी अंतरिक्ष मोहिमांसाठी आणि इतर कारणांसाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि इतर संस्थांनी हा कचरा हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काही खाजगी कंपन्यांनी ही यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे ज्यामध्ये जपान मधील चार खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एका खाजगी कंपनीचे संस्थापक रोबो उकाडा यांनी या मोहिमेची माहिती प्रसारित केली आहे. अंतराळात फिरणाऱ्या या तुकड्यांना बाजूला करण्यासाठी विशेष उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून हे तुकडे हटवण्यात येणार आहेत.
जर्मनीची अंतरिक्ष संशोधन संस्थेने या कामासाठी लेझर तंत्रज्ञान विकसित केलं आहे. युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेने एक गार्बेज यंत्रमानव तयार केला असून त्याच्या मदतीने हा कचरा साफ केला जाणार आहे. यंत्रमानवाचे हे तंत्रज्ञान 2023 मध्ये प्रत्यक्षात येणार आहे. नासाने हा कचरा साफ करण्यासाठी इलेक्ट्रॉनेट हे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे.
या तंत्रज्ञानाप्रमाणे एका मोठ्या जाळीमध्ये सर्व कचरा जमा केला जाणार असून पृथ्वीवर आणला जाईल पृथ्वीच्या वायू मंडळामध्ये जेव्हा हा कचरा प्रवेश करेल तेव्हा तो आपोआप जळून जाईल असेही संशोधकांना वाटत आहे. अमेरिकेतील सहापेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्याही या विषयावर संशोधन करत आहेत.