सपा नेत्याची गळा चिरून हत्या

बलरामपुर – समाजवादी पक्षाचे उत्तप्रदेशातील नेते फिरोज पप्पु यांची काल त्यांच्या घरानजिकच गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पप्पु (वय 35) हे तुलसीपुर नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष आहेत.
ते मंगळावारी रात्री घराकडे परतत असताना त्यांना काही जणांनी त्यांच्या घरानजिकच घेरले आणि त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीआयजी व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्या मृत्युची बातमी कळताच समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे.
या कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली. सूत्रांनी सांगितले की राजकीय वादातूनच ही हत्या करण्यात आली असावी. तुलसीपुर विधानसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवारीसाठी ते मोठे दावेदार मानले जात होते.



