दाक्षिणात्य गायिका सत्यावथी मंगलीची मराठी सिनेसृष्टीत एंट्री ! ‘विरजण’ चित्रपटातील हे गाणं चर्चेत

मुंबई – प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते हे सांगणारी एक अनोखी कहाणी ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘विरजण’ या चित्रपटातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेशजोडी करून देणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते हा संगीत अनावरण सोहळा पार पडला. कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रातं कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं. आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिने करून दिली आहे. ‘विरजण’ या चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय. ‘देवा’ या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे.
‘विरजण’ चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने आवाज देऊन मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गाण्याची जबाबदार मंगलीने उत्तमरीत्या पेलवली असून प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत. कपिल जोंधळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शिन केले असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे.
‘तू आणि मी, मी आणि तू’ हे नाव असलेला चित्रपट आता ‘विरजण’ या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.





