सेऊल – उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियादरम्यानच्या सीमेवर आज दोन्ही देशांदरम्यान जोरदार हवाई चकमक झाली. उत्तर कोरियाच्या ड्रोननी हवाई हद्दीचे उल्लंघन करून दक्षिण कोरियाच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर दक्षिण कोरियाच्या लडाऊ विमानांनी हल्ल्याचे इशारे देत त्यांना पिटाळून लावले. उत्तर कोरियाच्या ड्रोननी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या 5 ड्रोननी दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. त्यापैकी एक ड्रोन दक्षिण कोरियाची राजदानी सेऊलच्या उत्तरेकडील भागापर्यंत येऊन पोचले होते. असे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनी म्हटले आहे. या घुसखोरीला दक्षिण कोरियाच्या लष्कराने त्वरित उत्तर दिले.
इशाऱ्यासाठी गोळीबार केला. लढाऊ विमाने पाठवण्यात आली आणि ही ड्रोन पाडण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आली. या हेलिकॉप्टरनी सुमारे 100 वेळा गोळीबार केला, मात्र यामुळे ड्रोनचे किती नुकसान झाले, हे समजू शकले नाही. या हवाई चकमकीदरम्यान दक्षिण कोरियाच्या जमिनीवरील कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
Maldives : भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रकरण; माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना 11 वर्षांची शिक्षा
एक लढाऊ विमान कोसळले…
या हवाई चकमकीदरम्यान उत्तर कोरियाचे एक केए-1 लढाऊ विमान कोसळले. मात्र विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुपपणे बाहेर पडले. या हवाई चकमकीचा परिणाम म्हणून दक्षिण कोरियाने नागरी विमानतळांना राजधानी सेऊल आणि आजूबाजूच्या परिसरातील विमान उड्डाणे काही काळासाठी थांबवण्याची सूचना केली होती. सीमेजवळील महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी टेहळणी विमानेही त्वरित रवाना करण्यात आली होती. या टेहळणी विमानांना काय आढळले, हे समजू शकले नाही. मात्र उत्तर कोरिया देखील आपली ड्रोन उत्तर कोरियाच्या हद्दीत पाठवणार असल्याचे समजते आहे.