#T20WorldCup | द.आफ्रिकेच्या आशा कायम, रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा केला पराभव

शारजा – टी-20 विश्वचषकामधील सुपर-12 फेरीत दक्षिण आफ्रिकेने रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी आणि 1 चेंडू राखून पराभव केला. त्यानी 19.5 षटकात 6 बाद 146 धावा करत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा कायम ठेवल्या. दुसरीकडे पराभवामुळे श्रीलंकेसमोरील आव्हान खडतर झाले आहे. ग्रुप-1 मध्ये बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर गजविजेता विंडीजचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न जर-तर वर अवलंबून आहे.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर चौथ्या षटकात माघारी परतले. क्विंटन डिकॉक 12, तर रीझा हेन्ड्रिक्स 11 धावा करून तंबूत परतले. या दोन्ही फलंदाजांना दुशमंथा चमीराने बाद केले. त्यानंतर रस्सी वॅनदर दुस्सेन धावचीत होत तंबूत परतला. त्याने 11 चेंडूत 16 धावा केल्या.
यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा आणि ऍडन मारक्रम यांनी डाव सावरला. पण वनिंदू हसरंगाने 15 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मारक्रमला त्रिफळाचीत करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर 17 षटकाच्या पहिल्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाला निसंकाच्या हाती झेल देत तंबूचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या चेंडूवर प्रेटोरिअरला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. मात्र हॅट्ट्रिक घेऊनही संघाला विजय मिळवून देता नाही.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला कुसल परेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. संघाच्या 20 धावा असताना कुसल परेरा अनरिच नोर्तजेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पथुम आणि चरिथ असलंका या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी चरिथ धावचीत झाल्याने मोडली. कगिसो रबाडाने चरिथ 21 धावांवर असताना त्याला धावचीत केले.
यानंतर आलेला भानुका राजपक्षेही जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. त्याला आपले खातेही खोलता आले नाही. तबरेजने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूने पथुमने आपली झुंज सुरूच ठेवली. त्याने 58 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकल्याने त्यांच्या डाव 20 षटकांत सर्वबाद 142 धावांवर संपुष्टात आला.





