SA vs SL 1st Test : श्रीलंकेची आफ्रिकेविरूध्द अत्यंत लाजिरवाणी कामगिरी, 100 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ घडले…

South Africa vs Sri Lanka 1st Test : श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, या दोघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे होत आहे. या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे प्रभावित झाला आणि 20.4 षटकांचा खेळ होऊ शकला.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव 80 धावांवरून पुढे सुरू केला आणि सर्वबाद 191 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर या सामन्यात श्रीलंका आपली पकड मजबूत करेल अशी अपेक्षा होती पण फलंदाजीदरम्यान फ्लॉप शो झाला आणि अवघ्या 42 धावा करून संपूर्ण संघ कोलमडून पडला. यावेळी आफ्रिकन गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. या डावात श्रीलंकेचा एकही फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही.
🔄 | Change of Innings
The Proteas demolish the Sri Lankan batting line-up🔥🏏🇿🇦
🇱🇰Sri Lanka manage to post 42/10 in only 13.5 overs of play.#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/SfGojn5G6o
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 28, 2024
या सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ केवळ 13.5 षटकेच खेळू शकला आणि 42 धावा करून गडगडला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 10 आणि कामिंडू मेंडिसने 13 धावा केल्या. दिनेश चंडीमल, कुसल मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो आणि असिथा फर्नांडो यांना खातेही उघडता आले नाही. अँजेलो मॅथ्यूजने 1, दिमुथ करुणारत्नेने 2 आणि पथुम निसांकाने 3 धावा केल्या. यादरम्यान वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानं केवळ 6.5 षटके टाकली आणि 13 धावांत 7 बळी घेतले. मार्को यान्सनशिवाय जेराल्ड कोएत्झीनेही 2 बळी घेतले आणि कागिसो रबाडाला 1 यश मिळाले.
तत्पूर्वी, डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. बुधवारी दक्षिण आफ्रिकेने खेळण्यास सुरुवात केली, संघ 191 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 70 धावा केल्या तर केशव महाराजने 24, मार्को जॅन्सनने 13, कागिसो रबाडाने 15 आणि ट्रिस्टन स्टब्सने 16 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना 10 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी 3 बळी घेतले. विश्व फर्नांडो आणि प्रभात जयसूर्याने 2-2 विकेट घेतल्या.
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल, अनकॅप्ड खेळाडूची अचानक एंट्री…
श्रीलंकेच्या नावावर नकोसे विक्रम…
कसोटी इतिहासातील एका डावात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 1994 मध्ये श्रीलंकेच्या संघाने कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्व विकेट गमावून 71 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या या हंगामात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात लहान धावसंख्या आहे. याआधी गेल्या महिन्यात न्यूझीलंडने भारताचा डाव अवघ्या 45 धावांत गुंडाळला होता.
100 वर्षांनंतर पहिल्यांदाच….
या डावात श्रीलंकेचा संघ अवघ्या 83 चेंडूत ऑलआऊट झाला, यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ऑलआऊट होणारा हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी 1924 मध्ये एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 75 चेंडूत खेळताना 30 धावांवर सर्वबाद झाला होता. याचाच अर्थ कसोटी क्रिकेटमध्ये 100 वर्षांनंतरही कोणत्याही संघाची इतकी वाईट अवस्था झालेली नाही.

