साऊंड व्यवसायाचे आर्थिक “सूर’ विसकटले

- इतर उद्योगांप्रमाणे अटीशर्थींवर कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी
पुणे – अनलॉक सुरू होऊन सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न आदी कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. याशिवाय, लाखो रुपयांची साधने धुळखात आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परवानगी देण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
अनलॉकमध्ये शासनाने विविध व्यवसायांना टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफर्स, बॅंडपथकातील वादक, डी.जे. आदी व्यवसाय ठप्प आहेत.
परिणामी थकलेले हप्ते, पैशांची भ्रांत आदी सतावत असल्याने अनेकजण आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याची मागणी पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशने केली आहे.
आंदोलनाचा पवित्रा
असोसिएशनच्या वतीने या मागण्यांसाठी बुधवारी (7 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, सोमनाथ धेंडे, शिरीष पाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमांशी संबंधित पुण्यात 10 हजार व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिकाकडे 10 ते 50 कामगार आहेत. लग्न, गणेशोत्सव यासह कार्यक्रमांचा कालावधी संपला आहे. सध्या सर्व व्यावसायिक घरातच असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे पाठक यांनी सांगितले.





