सोरेन कुटूंबातील कलह चव्हाट्यावर ! कल्पना यांना मुख्यमंत्री करण्यास घरातूनच विरोध

नवी दिल्ली -झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडी चौकशीवरून त्या राज्यातील राजकारण आणि वातावरण तापले आहे. अशात सोरेन कुटूंबातील राजकीय कलह चव्हाट्यावर आला आहे. सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री बनवण्यास घरातूनच विरोध दर्शवण्यात आला आहे.
ईडीचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी मंगळवारी पक्षाच्या (झामुमो) आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, सोरेन यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यात आल्याचे समजते. त्याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सोरेन यांच्या वहिनी असणाऱ्या आमदार सीता सोरेन यांनी प्रतिक्रिया दिली.
कल्पना या आमदार नाहीत. त्यांना कुठलाही राजकीय अनुभव नाही. पक्षात इतर ज्येष्ठ नेते असताना त्यांचे नाव कसे काय पुढे केले जात आहे? सोरेन कुटूंबातील व्यक्तीचीच निवड करायची असल्यास मी सर्वांत ज्येष्ठ आहे. मी १४ वर्षांपासून आमदार आहे. कल्पना यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या कुठल्याही पाऊलाला मी तीव्र विरोध करेन, असे त्यांनी म्हटले.
हेमंत सोरेन यांचे थोरले बंधू दिवंगत दुर्गा यांच्या सीता या पत्नी आहेत. झामुमोच्या बैठकीला त्या उपस्थित नव्हत्या. आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आधीच कोंडीत सापडलेल्या सोरेन कुटूंब आणि झामुमोसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.





