राफेल विमानांच्या ताफ्यासाठी लवकरच महिला पायलट

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलामध्ये असलेली महिला पायलट लवकरच हवाई दलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट झालेल्या राफेल लढाऊ विमानांच्या ‘गोल्डन ऍरो’ या तुकडीमध्येही सहभागी होणार आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. या वैमानिक महिलेला सध्या राफेल विमाने उडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.
राफेल विमानासाठी पायलट म्हणून निवडण्यात आलेली महिला पायलट सध्या ‘मिग-21’ विमानाचे उड्डाण करत आहे. अंतर्गत प्रक्रियेतून राफेलच्या उड्डाणासाठी या पायलट महिलेची निवड करण्यात आली आहे.
सध्या हवाई दलामध्ये 10 महिला लढाऊ पायलट आणि 18 महिला नेव्हिगेटर आहेत. हवाई दलामध्ये अधिकारी महिलांची एकूण संख्या 1,875 इतकी आहे.
हवाई दलातील पायलट महिलांना आता लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून सहभागी करून घेतले जात आहे आणि गरजेनुसार या पायलट महिलांना लढाऊ विमानांच्या उड्डाण सेवेमध्ये सामावून घेतले जात आहे, असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गेल्याच आठवड्यात संसदेत सांगितले होते.





