लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला सोनू सुदचा मदतीचा हात; म्हणाला, “तुम्ही नंबर पाठवा…”

Sonu Sood | लातूर जिल्ह्यातील हाडोलती गावातील एका शेतकरी दाम्पत्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचे हे दयनीय चित्र पाहिल्यानंतर मनं सुन्न होते. ७५ वर्षीय अंबादास आणि मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दाम्पत्याकडे ना बैल आहेत, ना मजूर आणि ट्रॅक्टर भाड्यानं घेण्याचा विचारही ते करू शकत नाहीत. आर्थिक संकटात सापडलेल्या दाम्पत्याने स्वतःच नांगरणी करून पेरणी करण्याचा निर्णय घेतला.
अंबादास पवार नांगर ओढत पुढे चालत आहेत आणि त्यांच्या पत्नी पाठीमागून नांगर चालवत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. शेतीप्रधान म्हणवणाऱ्या भारतामधील शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या वास्तवाचं दुःखद दर्शन घडतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांच्या मदतीची घोषणा केली आहे.
सोनू सूदने पुढाकार घेत “तुम्ही नंबर पाठवा, मी बैलांची व्यवस्था करतो” अशी पोस्ट सोशल मीडिया एक्सवर केली आहे. यानंतर आता स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले आहे. कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. Sonu Sood |
आप नंबर भेजिए।
हम बैल भेजतें हैं। https://t.co/EnaNTQqiZ1— sonu sood (@SonuSood) July 2, 2025
स्थानिक प्रशासनही सक्रिय
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेतावर भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचे निदर्शनास आले.
कृषी विभागाकडून त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि शेतीसाठी आवश्यक साधनं मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा:
हातात टाळ आणि डोक्यावर तुळस… रिंकू राजगुरु पंढरीच्या वारीत झाली सहभागी





