‘4 वर्षांपासून चपाती खाल्ली नाही, कधी दारूला हातही लावला नाही…’, सोनू सूदने सांगितला खास डाएट प्लॅन

Sonu Sood Diet: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला ‘दबंग’, ‘सिंबा’ सारख्या चित्रपटातील कामामुळे ओळखले जाते. अभिनेत्याच्या फिटनेसची देखील विशेष चर्चा असते. लवकरच त्याचा नवीन चित्रपट ‘फतेह’ रिलीज होणार असून, तो सध्या याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने फिटनेस आणि आहाराबद्दल माहिती दिली.
मागील 4 वर्षांपासून चपाती खाल्ली नाही. तसेच, आयुष्यात कधीही दारूला हात लावला नसल्याचा खुलासा सोनू सूदने केला आहे. सध्या त्याचे वय 51 वर्ष आहे. मात्र, या वयातही तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो.
एका मुलाखतीमध्ये बोलताना सोनू सूदने सांगितले की, माझा आहार खूपच कंटाळवाणा आहे. लोक हे हॉस्पिटलमधील जेवण असल्याचे म्हणतात. घरातील सदस्य मांसाहारी जेवण जेवत असले तरीही मी मात्र शाकाहारी जेवणच करतो.
मागील 4 वर्षांपासून चपाती खाल्ली नाही. मात्र, कधी कधी मक्याची चपाती खातो. दुपारचे एक वाटी डाळ-भात एवढेच जेवण असते. तर नाश्त्याला अंड्याचे आमलेट, सॅलड, एवोकॅडो, तळलेल्या भाज्या किंवा पपई खायला आवडते, असेही अभिनेत्याने त्याच्या आहाराबद्दल माहिती देताना सांगितले.
आयुष्यात कधी दारू प्यायली नाही, असेही सोनू सूदने सांगितले. तसेच, सलमान खानने रेडबुलमध्ये दारू टाकून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मी स्पष्ट नकार दिला, असा मजेशीर किस्सा देखील त्याने मुलाखतीत सांगितला. दरम्यान, सोनू सूदचा नवीन चित्रपट ‘फतेह’ 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसची देखील प्रमुख भूमिका आहे.





