सोनू सूदला होती थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर, अभिनेत्याने सांगितले नकार देण्याचे कारण

Actor Sonu Sood On Politics : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आपल्या चित्रपटातील कामासोबतच गरजूंना मदत करण्यासाठी देखील ओळखला जातो. कोव्हिड महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात त्याने हजारो गरजू नागरिकांसाठी जेवण व प्रवासाची सोय केली होती. लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्याने केलेल्या कामाची भरपूर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या कामामुळे थेट मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती, असा खुलासा सोनू सूदने केला आहे.
सोनू सूदचा ‘फतेह’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोनू सूद या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याला राजकारणातील प्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना त्याने आपल्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती, असा खुलासा केला.
एका मुलाखतीमध्ये बोलताना त्याने सांगितले की, मला मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती. यासाठी नकार दिल्यावर उपमुख्यमंत्री व्हा, असे म्हणाले. ते खूप मोठे लोकं आहेत. राज्यसभा सदस्य बनण्याचीही ऑफर देण्यात आली होती. तुम्हाला निवडणूक लढवायची काय गरज आहे, असे ते म्हणाले. तो खूप उत्साही काळ होता. मोठमोठी लोकं तुम्हाला भेटत असतात, जगात येऊन काहीतरी मोठे करावे असे त्यांना वाटत होते.
मला कोणीतरी म्हणाले की, एवढी मोठी लोकं तुला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देत आहे, तू का स्विकारत नाही? इंडस्ट्रीमधील मोठमोठे कलाकार हे बनण्याचा विचारही करू शकत नाही व तू नाकारत आहेस, असेही या मुलाखतीत बोलताना सोनू सूद म्हणाला.
राजकारणात लोकं दोन कारणांमुळे येतात. एक म्हणजे पैसा व दुसरी पॉवर. मला दोन्हींची आवड नाही. राहिले मदतीचे. तर ते मी आता सुद्धा करत आहे. सध्या मी एक दिग्दर्शक व अभिनेता आहे. मात्र, जेव्हा वाटेल काहीतरी करायला हवे, तेव्हा ठरूया.’ असे यावेळी बोलताना त्याने राजकारणात न जाण्याविषयीचे कारण सांगितले.





