सोनिया परचुरे यांनी सांगितला अतुल परचुरे यांचा अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते ‘अतुल परचुरे’ यांचे निधन झाले आहे. त्यांनी ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.
राठीसह हिंदी प्रेक्षकांनाही खळखळून हसायला भाग पाडणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर योग्य उपचार घेऊन त्यांनी या आजारावर मात केली आणि ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर कमबॅक केले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सोनिया परचुरे यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
दरम्यान अतुल परचुरे यांच्या पत्नी आणि नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी अतुल यांना त्यांच्या या कठीण काळात कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले होते याबाबत भाष्य केले होते. या दिवसांमध्ये पत्नी म्हणून त्या किती हतबल झाल्या होत्या याचा एक प्रसंग सांगितला होता. कॅन्सरच्या काळात अतुल परचुरे यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनिया परचुरे अगदी खंबीरपणे उभ्या होत्या.
त्या म्हणाल्या कोणत्याही कलाकारासाठी त्याचा आवाज हा फार महत्त्वाचा असतो. मात्र जेव्हा अतुलवर उपचार चालू होते तेव्हा त्याचा आवाज कमी व्हायला लागलेला. तेव्हा मी डॉक्टरांना बोलले, याचा आवाज कमी होतोय. असे होऊन चालणार नाही. तेव्हा ते मला फक्त हो मी समजू शकतो असे म्हणाले. त्यावेळी अतुलची अवस्था पाहून मला सतत वाटायचे की मी याला कसे यातून बाहेर काढू. आपण बायको असलो तरीही त्या माणसाला ज्या काही यातना होत आहेत त्या पाहून आपण काहीही करू शकत नाही.
त्या पुढे म्हणाल्या त्यावेळी मला खूप लोकांनी फोन केले. काही लोक सोमनाथ, गिरनार वगैरे कुठेतरी जायचे आणि तिथे जाऊन अतुलसाठी प्रार्थना करायचे. आम्ही कोणालाच सांगितले नव्हते की हे त्याच्यासाठी करा पण लोक स्वतःहून त्याच्यासाठी प्रार्थना करायचे की अतुल बरा झाला पाहिजे आणि तेच झाले. अतुल यातून बाहेर आला.





