Sonia Gandhi | काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांची काल (21 फेब्रुवारी) प्रकृती बिघडली. अचानक प्रक्रृती खालावल्यामुळे त्यांना नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. स्वरूप यांनी माहिती दिली की, गांधी यांना पोटासंबंधी समस्या झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची एक टीम उपचार आणि निगराणी ठेवत आहे. त्यांच्या काही आरोग्य तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, लवकरात लवकर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 78 वर्षीय सोनिया गांधी यांना वयाच्या कारणामुळे अनेकदा आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याने यापूर्वीही सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच संसदेच्या बजेट सत्रात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्या प्रकृती अगदी व्यवस्थेत होती. जनगणनेच्या मुद्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. दरम्यान, डिसेंबर 2024 मध्येही तब्येत बिघडल्याने काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.