अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का?; सोनिया दुहान स्पष्टच बोलल्या,….

Sonia Duhan । राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात बंड झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदारासह सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह घड्याळही मिळालं आहे. त्यातच बारामतीची लोकसभा निवडणूकही नुकतीच पार पडली आहे. या सगळ्यानंतर शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या लेडी जेम्स बाँड अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात आता सोनिया दुहान यांनीच स्पष्टपणे उत्तर दिलंय.
मी शरद पवार गट सोडलेला नाही Sonia Duhan ।
अजित पवारांच्या गटात सहभागी होण्याच्या चर्चांवर बोलताना दुहान यांनी,” मी शरद पवार गट सोडलेला नाही, तसंच मी दुसऱ्या पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाणार नाही. मला काल लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली. मात्र अजित पवारांच्या घरी आमदार आले तेव्हा तर सुप्रिया सुळेही तिथे होत्या. पक्ष फुटण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवासस्थानी होत्या. त्यांनी कुठे अजित पवारांचा पक्ष सोडला. मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही. तसंच मी शरद पवारांचा पक्ष सोडणार नाही.” असे स्पष्टपणे सांगितले आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीही सोबत Sonia Duhan ।
दरम्यान, राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जेव्हा तो मागे घेतला तेव्हा त्या शरद पवारांच्या मागच्या खुर्चीत बसल्या होत्या. त्यांच्या तिथे असण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यासोबतच पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही त्यांचं नाव चर्चेत होतं. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि ‘लेडी जेम्स बाँड’ समजल्या जाणाऱ्या सोनिया दुहान आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार या चर्चा सोमवारी सुरु झाल्या. याचं कारण सोनिया दुहान या अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला मागच्या दाराने पोहचल्या. धीरज शर्मा आणि सोनिया दुहान असे दोघेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, हे जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा सोमवारी झाल्या. याच बाबत आता सोनिया दुहान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.





