नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला असून राज्यात काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा येत्या २९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यात काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीकडे अपेक्षित बहुमत असल्याने त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठीचा दावा केला असून जेएमएमचे नेते तथा शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी हेमंत सोरेन यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना हेमंत सोरेन यांनी सोनिया गांधी यांनी आपल्याला शपथविधी सोहळ्याला आपण राहुल गांधी यांच्यासमवेत हजेरी लावू असे आश्वासन दिल्याचे सांगितले.
तत्पूर्वी ८१ जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने जोरदार मुसंडी मारताना सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला १६ तर राजदला एका जागेवर यश मिळाले असून काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीला ४७ जागा मिळाल्याने बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ जागांचा आकडा त्यांनी आरामात पार केला आहे.